'मला तर वाटतं गोळ्या घालून...', उदयनराजे राहुल सोलापूरकरांवर संतापले, म्हणाले 'जिथे दिसेल तिथे...'

Udyanraje Bhosle on Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी अतिशय घृणास्पद वक्तव्य केलं आहे. यानंतर त्यांच्याविरोधात संताप व्यक्त होत असताना उदयनराजे भोसले यांनीही आक्षेप नोंदवला आहे.   

शिवराज यादव | Updated: Feb 5, 2025, 03:48 PM IST
'मला तर वाटतं गोळ्या घालून...', उदयनराजे राहुल सोलापूरकरांवर संतापले, म्हणाले 'जिथे दिसेल तिथे...' title=

Udyanraje Bhosle on Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलेल्या विधानामुळे सध्या संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलन केलं जात असून नाक घासून माफी मागावी अशी मागणी होत आहे. यादरम्यान उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत आपला निषेध नोंदवला आहे. अशा लोकांच्या जीभा हासडल्या गेल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना जनतेने दिसले तिथे ठेचून काढलं पाहिजे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. 

"छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य कारभारात लोकांचा सहभाग व्हावा म्हणून विचार मांडला. लोकशाहीत आपण वावरतो त्याचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी रचला आहे. त्यांनी कधी स्वत:चा स्वार्थ पाहिला नाही. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना आपलं कुटुंब मानलं. त्यांनी कधी तत्वाशी तडजोड केली नाही. असं असताना अनेकजण त्यांच्याबद्दल अशी गलिच्छं विधानं करतात. टीव्हीवर ते पाहत असताना मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना झाल्या," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 

पुढे ते म्हणाले, "हा सोलापूरकर कोण आहे? अशा लोकांना लाच पलीकडे काही समजत नव्हतं. लावली जीभ टाळ्याला असा हा प्रकार आहे. अशा लोकांच्या जिभा हासडल्या गेल्या पाहिजेत. महापुरुषांबद्दल अशी विधानं करणाऱ्यांना जनतेने दिसले तिथे ठेचून काढलं पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. वेगवेगळ्या जाती धर्मात जे तेढ निर्माण होतं ते अशा विकृत लोकांमुळे होतं". 

"मी याप्रकरणी देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांना भेटणार आहे. अशी विधानं करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा खटला चालवला जावा अशी मागणी करणार आहे. महाराजांचे विचार जपले नाहीत, तर देशाचे तुकडे होण्यास फार वेळ लागणार नाही. त्यासाठी ही विकृत विधानं कारणीभूत आहेत. यापुढे यांचे चित्रपट हाणून पाडले पाहिजे. दिग्दर्शक, निर्मात्यांनीही अशा लोकांना थार देता कामा नये. या लोकांना गाडलं पाहिजे. जर गाडलं नाही तर देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे," असंही ते म्हणाले आहेत.
 
पुढे त्यांनी सांगितलं की, "मी कठोर शब्दांत निषेध करतो. मला तर वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे लोक असतील त्या सर्वांनाच घातल्या पाहिजे. जिथे दिसेल त्यांना ठेचा आणि गाडा असंच मी सांगेन". 

 

राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते?

पेटारे-बिटारे काहीच नव्हतं.  शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते. त्यासाठी त्यांनी हुंडी वटवली याचे पुरावे आहेत.  महाराजांनी औरंगजेबाचा वकील, त्याच्या बायकोला लाच दिली होती.  औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र महाराजांनी घेतलं होतं.  त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले.  सर्वात शेवटी स्वामी परमानंद 5 हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खूण, पुरावे आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती.  मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हंटलं, की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली, की इतिहासाला छेद दिला जातो असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेते राहुल सोलापुरकर यांनी केलं होतं.