Veer Pahariya Apologise to Pranit More: सोलापुरात स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला (Stand Up Comedian Pranit More) मारहाण झाल्यानंतर अभिनेता वीर पहाडियाने (Veer Pahariya) माफी मागितली आहे. आपल्या शोमध्ये वीर पहाडियाबद्दल विनोद केल्याने मारहाण केल्याचा आरोप प्रणित मोरेने केला होता. प्रणित मोरेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सोलापूरमध्ये नेमकं काय झालं होतं हे सविस्तर सांगितलं होतं. पोलिसांनी आपली तक्रार घेण्यास नकार दिला, असा आरोपही त्याने केला होता. यानंतर आता वीर पहाडिया यावर व्यक्त झाला असून, जाहीर माफी मागितली आहे.
प्रणित मोरेला मारहाण झाल्यानंतर वीर पहाडियाने माफी मागितली आहे. त्याने इंस्टाग्रामला स्टोरी शेअर केली असून त्यार प्रणितला टॅग केलं आहे. आपला या घटनेशी काही संबंध नसल्याचा दावा त्याने केला आहे. तसंच जे कोणी यात सहभागी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.
पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे की, "कॉमेडियन प्रणित मोरेसह जे काही झालं आहे त्यामुळे मला धक्का बसला आहे. मला स्पष्ट करायचं आहे की, माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. मी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचं समर्थन करत नाही. मी क्रिएटिव्ह फिल्डमध्ये असताना अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीला पाठबळ देणार नाही. प्रणित आणि त्याच्या चाहत्यांची मी माफी मागतो. यात सहभागी आहेत त्यांनी शिक्षा व्हावी यासाठी मी स्वत: लक्ष घालेन".
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या टीमने पोस्टमध्ये सांगितलं आहे की, "2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.45 वाजता सोलापुरातल्या 24K Kraft Brewzz येथे प्रणितचा स्टँड-अप शो झाल्यानंतर तो नेहमीप्रमाणे चाहत्यांनी भेटण्यासाठी आणि फोटोसाठी थांबला. गर्दी कमी झाल्यावर 11-12 जणांचा गट चाहत्यांच्या वेशात त्याच्याजवळ आला. पण ते फोटोसाठी आले नव्हते. ते त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आणि धमकावण्यासाठी आले होते. त्यांनी निर्दयपणे त्याला मारहाण केली. त्याच्यावर सतत ठोसे आणि लाथांचा वर्षाव केला ज्यामुळे तो जखमी झाला".
पुढे त्यांनी सांगितलं की, "या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तनवीर शेख होता. त्याने आणि त्याच्या टोळीने स्पष्ट शब्दांत सांगितलं की, अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा. याचा थेट अर्थ म्हणजे पुन्हा जोक मारल्यास गंभीर परिणाम होतील. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे व्हेन्यू, 24K Kraft Brewzz येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती. आणि आता सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी केलेल्या विनंत्यांना त्यांनी नकार दिला आहे. आम्ही पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क केला. त्यांनी मदतीसाठी येतो सांगितलं, पण कोणी आलं नाही".