मुंबई : 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाच्या वादावर अभिनेत्री कंगणा रानौत हिनं करणी सेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. करणी सेनेची माफी मागण्याचा प्रश्नच नाही असं कंगणानं ठणकावलंय. राणी लक्ष्मीबाई ही भारताची कन्या आहे, करणी सेनेनंही हे लक्षात घ्यावं आणि चित्रपटाचा विरोध मागे घ्यावं, असं कंगणानं म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, करणी सेनेनं कंगनाला, माफी मागितली नाही तर घराबाहेर आंदोलन करणार' असल्याची धमकी दिल्यानंतर मंगळवारी मुंबई करणी सेनेनं कंगनाला धमकी दिल्यानंतर तिच्या घरासमोर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती.
पोलिसांनीही करणी सेनेला आंदोलनाची परवानगी नाकारत कायदे तोडण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसंच जुहू पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानंतर करणी सेनेच्या सात सदस्यांवर तडीपारीची कारवाई केली होती. सिनेमा प्रदर्शित होईपर्यंत या सात जणांना शहरात बंदी घालण्यात आलीय. करणी सेनेकडून धमक्या मिळाल्यानंतर ते असाच त्रास देत असतील तर आपण त्यांना धुळीला मिळवून टाकू, असं वक्तव्य कंगना रानौत हिनं केलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत करणी सेनेनं कंगनाकडे माफिची मागणी केली होती.
दुसरीकडे, बॉलिवूड मात्र मणिकर्णिकेच्या प्रेमात पडताना दिसतंय. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या सिनेमामुळे काळाआड गेलेली राणी लक्ष्मीबाई पुन्हा एकदा लोकांच्या समोर येईल. तुम्ही सिनेमात जेव्हा 'हर हर महादेव'ची घोषणा ऐकता तेव्हा तेव्हा कंगना रानौतचा जन्म राणी लक्ष्मीबाईचीच भूमिका निभावण्यासाठी झालाय याची प्रचिती येते, असं म्हणत मनोज कुमार यांनी बॉलिवूड क्वीनवर कौतुकाची फुलं उधळलीत. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.