कोलकाता : प्रसिद्ध बॉलिवूडमधील पार्श्वगायक केके (KK) ऊर्फ कृष्णकुमार कुन्नतचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालंय. के.के कोलकात्यातील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान कॉन्सर्टनंतर त्याची तब्येत बिघडली आणि तो अचानक खाली कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, केकेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. कॉन्सर्टनंतर त्याच्या तब्येत बिघडल्याची बातमी आली होती, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.
दरम्यान केकेच्या मृत्यूचं खरं कारण समोर येण्यासाठी 12 वाजता त्यांचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, पोस्टमार्टनंतरचं त्याच्या मृत्यूचं योग्य कारण समोर येऊ शकतं. तर समोर आलेल्या माहितीनुसार, केकेच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. यामुळे केकेच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे.
न्यू मार्केट पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी शिफ्ट मॅनेजरची चौकशी केलीये. केके हॉटेलमध्ये कधी आला? त्याच्यासोबत कोण होतं? हॉटेलमध्ये त्याच्या खोलीत कोण आलं? याची माहिती पोलिसांना हवीये.
याशिवाय केकेने काय खाल्लं होतं हे जाणून घेण्यासाठी पोलीस शिफ्ट मॅनेजरशी बोललेत. त्याची संपूर्ण माहिती पोलीस घेत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीसांनी हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज तपासले केले आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत. केके शेवटच्या क्षणी कोणासोबत होता आणि त्याचे काय झाले हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करतायत.