मुंबई : प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणा-या कलाकारांचा आणि तंत्रज्ञाचा गौरव करणारा सोहळा म्हणजे महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा पुरस्कार.
वर्षाकाठी येणा-या विविध मराठी चित्रपटांपैकी आपल्या पसंतीचे चित्रपट, कलाकार निवडण्याची संधी प्रेक्षकांना देणारा हा सन्मान सोहळा प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरला. रसिक प्रेक्षकांना आपल्या मतांचा कौल देता यावा या हेतूने झी टॉकीज महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा आगळा-वेगळा सन्मान सोहळा गेल्या नऊ वर्षापासून आयोजित होत असून यंदा सोहळ्याचे दहावे वर्ष आहे.
सिनेकलाकारांचे बहारदार परफॉर्मन्स आणि मनोरंजनाची परिपूर्ण मेजवानी असलेले महाराष्ट्रातील एकमेव व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१७ येत्या २८ जानेवारीला सायंकाळी ६.३० वाजता झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
या दिमाखदार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा सर्वांचे लाडके अभिनेते वैभव तत्ववादी आणि अमेय वाघ यांनी सांभाळली. महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, मृणाल कुलकर्णी, संजय जाधव, प्रियदर्शन जाधव, सुमेध मुद्गलकर, जितेंद्र जोशी, राजेश म्हापुसकर, भूषण प्रधान, मनवा नाईक या आणि अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी रेड कार्पेटवर त्यांच्या स्टाईलची झलक दाखवली.
प्रेक्षकांचा आवडता ऍक्टर आणि डान्सर सुमेध मुद्गलकरने गणेश वंदना करून पुरस्कार सोहळ्याची शानदार सुरुवात केली.
दिलखेचक अदाकारा अमृता खानविलकर हिने दीपिका पदुकोणच्या गाण्यांवरती ठेका धरला. महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना मनोरंजित करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव याने तानाजी मालुसरे यांना मानवंदना देत बाहुबली मधील सुप्रसिद्ध गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स केला. शरद केळकर याने बॉलिवूडच्या चार्टबस्टर गाण्यावर दमदार परफॉर्मन्स तर दिलाच पण त्यातून 'से नो टु ड्रग्स' हा सामाजिक संदेश पण दिला. वैभव तत्ववादी आणि मृणाल ठाकूर यांनी महाराष्ट्राला याड लावलेल्या चित्रपट सैराटमधील 'सैराट झालं जी' या गाण्यावर अप्रतिम परफॉर्मन्स सादर केला.
मराठी सिनेसृष्टीतील भारदस्त व्यक्तिमत्व महेश मांजरेकर यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील सिनेकलाकारांवर त्यांच्या विशिष्ट शैलीत टिपणी केली. सिनेतारकांनी गजबजलेला आणि दमदार परफॉर्मन्सेसची मेजवानी असलेला शानदार पुरस्कार सोहळा महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१७ पाहायला विसरू नका रविवारी २८ जानेवारी २०१८, सायंकाळी ६.३० वाजता फक्त झी टॉकीजवर