Aadesh Bandekar Car Stuck In Tunnel : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय आणि आघाडीचे अभिनेते म्हणून आदेश बांदेकरांना ओळखले जाते. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी महाराष्ट्रातील तमाम महिलांचा सत्कार आणि सन्मान केला. “बांदेकर पैठणी घेऊन आले…” अशी त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता आदेश बांदेकर यांची कार तासभर खंबाटकी बोगद्यात अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आदेश बांदेकर हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच आदेश बांदेकरांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते साताऱ्याहून मुंबईला येणाऱ्या खंबाटकी घाटात अडकल्याचे दिसत आहे. या घाटातील बोगद्यात एक मोठा मालवाहू ट्रक अडकला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. यामुळे अनेक वाहने ही खंबाटकी घाटातील बोगद्यात अडकून राहिल्याचे चित्र पाहायला मिळालं.
आदेश बांदेकरांनी हा व्हिडीओ शेअर करताना त्याला कॅप्शन दिले आहे. "वाई मुंबई प्रवास सुरू असताना खंबाटकी बोगद्यामधे १ तास अडकून रहाणं… हि वेळ कोणावरच येऊ नये… पुन्हा प्रवास सुरू… धन्यवाद खंबाटकी परिसर पोलीस आणि क्रेन चालकांना", असे आदेश बांदेकरांनी म्हटले आहे. आदेश बांदेकर हे खंबाटकी बोगद्यामध्ये 1 तास अडकून होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर त्यांचा प्रवास पुन्हा झाला, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान आदेश बांदेकर हे एका कामानिमित्त साताऱ्यात गेले होते. तिथून मुंबईत परतत असताना हा सर्व प्रकार घडला. त्यांच्या या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने "स्वामींची कृपा सुटका झाली", असे म्हटले आहे. तर एका चाहत्याने "23 dec 2023 देखील असच प्रसंग आमच्यावर आला होता. खंबाटकी घाटात चढणी ला गाड्यांच्या रांगा आणि गाड्या हीटअप होऊन बंद पडत होत्या. आमच्या सोबत लहान मुलं. जवळ जवळ 1.5-2 तास आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो आणि ते सर्व ट्रॅफिक चढणी वर. ड्रायव्हर्स ची कस लागली होती. खूपच बेकार हाल झाले", असा किस्सा सांगितला आहे.