मुंबई : राकेश ओम प्रकाश मेहरा दिग्दर्शित 'रंग दे बसंती' या चित्रपटानं देशप्रेमाची एक वेगळी बाजू 16 वर्षांपूर्वी देशासमोर मांडली. चित्रपटाच्या कथानकापासून ते त्यातील प्रत्येक गाण्यापर्यंत, सर्वच घटकांचा असा मेळ साधला गेला की चाहत्यांना या चित्रपटाची भुरळ पडली. (Lata Mangeshkar )
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाचा साजही या चित्रपटातील एका गाण्याला चढला.
'आजा साँझ हुई मुझे तेरी फिकर...' असं म्हणत दीदींनी 'लुका छुपी' हे गाणं गायलं आणि साऱ्या देशाच्या डोळ्यांतून आसवं घरंगळली.
असं म्हटलं जातं की दीदींनी चार दिवस या गाण्याचा सराव केला होता. सुरुवातीला तर दीदींनी या गाण्यासाठी काही कारणानं नकार दिला होता.
पण, अचानकच काही महिन्यांनी मेहरा यांनी त्यांना फोन केला आणि त्या गाण्यासाठी तयार झाल्या. पण, तेव्हापर्यंत गाण्याचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं.
हे जाणून दीदी थक्क होत्या की, गाणं रेकॉर्ड होण्याआधी चित्रीतही होतं.
पुढे दीदी चेन्नई दौऱ्यावर गेल्या असतात तिथेच असणाऱ्या संगीतकार ए.आर. रहमान यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन दररोज त्या गाण्याचा सराव करत होत्या.
जवळपास दीदींनी 4 दिवस गाण्याचा सराव केला. रेकॉर्डींगच्या दिवशी त्या माईकसमोर उभ्या राहिल्या आणि तासन् तास हे गाणं गायल्या.
'त्या रहमान यांच्याशी बोलल्या आणि माईकपाशी गेल्या. आम्ही तिथेच होतो. त्या तिथे उभ्या होत्या, त्यांची पावलं जमिनीला स्पर्ष करत होती.
आम्ही काही फुलं आणि पाण्याची बाटली, तसंच एक खुर्ची त्यांच्यासाठी ठेवली. आठ तासांसाठी गाण्याचं रेकॉर्डिंग चाललं आणि विश्वास नाही बसणार पण त्या 8 तास उभ्याच राहिल्या.' असं मेहरा म्हणाले.
लतादीदींनी ज्या आर्ततेनं हे गाणं गायलं ते पाहून आणि ऐकून काळजाचं पाणी झालं... तुम्ही ऐकलं का हे गाणं?