मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानने भारताला पुलवामा हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं सांगितले. परंतु पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला तुम्ही आमच्यावर हल्ला करण्याचा विचार करत असाल आणि आम्ही प्रतिकार करणार नाही असे वाटत असेल तर ते पूर्णपणे चूक आहे. भारताने हल्ला केल्यास आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ असं धमकीवजा भाषणच दिलं. इम्रान खान यांच्या भाषणानंतर पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफर याने आपल्या पंतप्रधानांच्या भाषणाचं कौतुक करत एक ट्विट केलं आहे. अली जफरने केलेल्या या ट्विटनंतर त्याला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे.
अली जफरच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी त्याला चांगलंच धारेवर धरलं आहे. आता पुन्हा भारतात येऊन तर दाखव मग समजेल अशा शब्दात नेटकऱ्यांकडून त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
What a speech! @ImranKhanPTI
— Ali Zafar (@AliZafarsays) February 19, 2019
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर भारताकडून बंदी घालण्यात आली आहे. त्याबरोबरच मॅडॉक फिल्म्सने आपल्या 'लुका छुपी', 'अर्जुन पटियाला' आणि 'मेड इन चायना' हे चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. 'टोटल धमाल' चित्रपटाच्या टीमनेही चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याची घोषणा केली आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण बॉलिवूडमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक बॉलिवूड कलाकार शहीदांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अजय देवगण, अमिताभ बच्चनसह अनेकांनी मदत केली आहे. सलमान खान प्रोडक्शन निर्मित 'नोटबुक' चित्रपटानेही शहीदांच्या कुटुंबियांसाठी २२ लाख रूपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.