मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वात त्याचप्रमाणे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार आणि त्यांचा चाहता वर्गाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आता ऋषी कपूर यांची पत्नी नितू कपूर आणि मुलगा रणबीर कपूर यांनी देखील राहत्या घरी श्रद्धांजली वाहिली आहे. दोघेही ऋषी कपूर यांच्या फोटोच्या बाजूला बसलेले दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा ह्रदयस्पर्शी फोटो तुफान व्हायरल होत आहे.
गुरूवारी ३० एप्रिल २०२० रोजी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमियाशी (leukemia) झुंज देत होते. ल्यूकेमियाशी या गंभीर आजाराचं निदान लागण्याआधी ते 'शर्माजी नमकीन' या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त होते. पण कर्करोगासारखा गंभीर आजार बळावल्यामुळे त्यांना उपचारासाठी परदेशात जावे लागले.
उपचारानंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी १५ जानेवारी २०२० पासून चित्रपटाच्या शुटींगसाठी नव्याने सुरूवात केली. चित्रपटाच्या प्रॉडक्शनचं काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांना अखेरच्या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.
१९७० ते १९९० हा काळ ऋषी कपूर यांनी आपल्या अभिनयाने गाजवला. 'अमर अकबर अँथोनी', 'कुली', 'कर्ज' या चित्रपटांमधून त्यांनी एकाहून एक अशा सरस भूमिका साकारल्या. आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात ऋषी कपूर यांनी चरित्र अभिनेते म्हणून ओळख मिळवली. 'हम तुम', 'अग्निपथ', 'कपूर अँण्ड सन्स' या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.