Sakshi Tanwar Father On Kissing Scene Of Daughter With Ram Kapoor: अभिनेता राम कपूर आणि अभिनेत्री साक्षी तन्वरची प्रमुख भूमिका असलेला 2011 साली प्रदर्शित झालेला, 'बडे अच्छे लगते है' हा कार्यक्रम तुफान गाजला होता. डेली सोप प्रकारातील ही मालिका विशेष चर्चेत राहिली ती दोन्ही प्रमुख कलाकारांमधील किसींग सीनमुळे. छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच अशा पद्धतीचा किसींग सीन शूट करण्यात आलेला. भारतीय मालिका सृष्टीमधील पहिला किसींग सीन अशी त्याची जोरदार जाहिरात झाली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राम कपूर यांनी या सीनबद्दल एक रंजक माहिती दिली आहे. या सीनच्या शूटदरम्यान आणि आधी-नंतर काय घडलं हे राम कपूर यांनी सांगितलं आहे.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये राम कपूरने, या किसींग सीनसाठी निर्माती एकता कपूरला माफी मागावी लागली होती. "एकताला माफी मागावी लागली होती. मी याबद्दल कधीच माफी मागितली नाही. एक अभिनेता म्हणून अभिनय करणे हेच माझं काम आहे. मी कोणाला स्पष्टीकरण देण्यास बांधील नाही. एक प्रोफेश्नल म्हणून मी करारावर स्वाक्षरी करुन निर्मात्यांकडून पैसे घेतले आहेत. दिलेली स्क्रीप्ट फॉलो करणे एवढेच माझे काम आहे. तो किसींग सीन स्क्रीप्टमध्ये होता. मी त्याला नाही म्हणून शकत नव्हतो. जर मी तसं केलं असतं तर मी अभिनेता म्हणण्यास लायक नव्हतो. नखरे करणारा मी अभिनेता नाही. मी तो सीन करुन काहीच चूक केलेली नाही," असं स्पष्ट मत राम कपूरने मांडलं.
किसींग सीनच्या आधी आपण दोन वेळा एकता कपूरकडून खरोखरच हा सीन करायचा आहे ना? याबद्दल विचारणा केलेली होती असंही म्हटलं आहे. एकता याबद्दल फार महत्त्वकांशी होती आणि तिला हा सीन आधीपासूनच फार आश्वासक वाटत होता. "एकतानेच तो सीन लिहिला होता आणि तो करावा असं तिचं म्हणणं होतं. मी एकताला विचारलं, तुला खात्री आहे ना आपण हे टीव्हीवर करायचं आहे? अशाप्रकारचा किसींग सीन त्यापूर्वी कोणीही केलेला नव्हता. छोट्या पडद्यावर किस करणारे आम्ही पहिलेच होतो. त्यामुळे ती फार मोठी गोष्ट होती. तीन पिढ्या तो कार्यक्रम एकत्र पहायच्या. सासू-सासरे, पती आणि मुलंही. मात्र एकता यावर विश्वास होता. तीच म्हणाली की आपण हा सीन करुयात. तिला आमच्यावर विश्वास वाटत होता आणि मी त्याला सहमती दर्शवली. मी आधी माझ्या पत्नीची परवानगी घेतली. तिने मला तुझा तू निर्णय घे, असं सांगितलेलं," अशी माहिती राम कपूरने दिली.
राम कपूरने या सीनच्या आधी साक्षीच्या वडिलांबरोबरही फोनवरुन चर्चा केली होती. हा सीन शूट करण्याआधी त्यांची परवानगी घेतलेली. "त्यानंतर मी साक्षीला सांगितलं. तुला काही अडचण असेल तर मी एकताला समजावेल. तू मला मोकळेपणे सांग, अं म्हणालो होतो. मी कधीच माझ्या सहकलाकारांबरोबर रोमँटीक होण्याचा विचार करु शकत नाही कारण त्या माझ्यासाठी एका वेगळ्याच लेव्हलला असतात. साक्षीच्या वडिलांनी मला फोन केला आणि ते मला फोनवर एक फारच सुंदर गोष्ट म्हणाले. "राम तू है तो सब ठीक है" (राम तू आहेस तर सगळं ठीकच असेल.) साक्षीलाही या सीनमध्ये काही अडचण वाटली नाही. त्यांनी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला," असं राम कपूरने सांगितलं.
"आम्ही दोन रात्री घेऊन हा सीन शूट केला. त्यानंतर जो गोंधळ होणार होता त्याला एकतालाच सामोरे जायचं होतं कारण ही आमची कल्पना नव्हती. ती कल्पना तिची होती आम्हाला ती फक्त स्क्रीनवर साकारायची होती. त्यानंतरही मी आणि साक्षी कधीच एकमेकांबरोबर अगदी अवघडल्यासारखे वागलो नाहीत. आम्हाला एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे. आमचं बॉण्डींग वेगळ्याच स्तरावरचं आहे," असं राम कपूर म्हणाला.