Satish Shah London Airport Incident: आज आपण 21 व्या शतकात असलो तरीही काही बाबतीत मात्र अद्यापही आपण पुढे आलेलो नाही याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. आम्ही पुरोगामी विचारांचे, आम्ही मानवी स्वभावाचा पुरस्कार न करणाऱ्या रुढींचा विरोध करणारे वगैरे वगैरे म्हणत आव आणण्यांचा खरा चेहरा यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आला आहे. 'साराभाई व्हर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) फेम सतीश शाह (Satish Shah) यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं भारतीयांविषयी आजही परदेशात नेमकी काय विचारसरणी आहे हे उघड झालं आहे.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांनी (london) लंडनमधील हिथ्रो विमानतळावर आपल्यासोबत घडलेल्या एका अनपेक्षित आणि तितक्याच संतापजनक प्रसंगाबाबत ट्विट करत माहिती दिली. हल्लीच शाह फर्स्ट क्लासमधून लंडनचा प्रवास करत होते. त्याचवेळी त्यांनी जे काही ऐकलं ते पाहता एक भारती म्हणून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पण, प्रसंगाचं भान राखत त्यांनी चक्क 'इंद्रवर्धन' स्टाईलमध्ये या परदेशी साहेबांना उत्तर दिलं.
I replied with a proud smile “because we are Indians” after I overheard the Heathrow staff wonderingly asking his mate”how can they afford 1st class?”
— satish shah (@sats45) January 2, 2023
शाह यांनी ट्विट करत विमानतळावरील प्रसंग शब्दांत मांडला. त्यांचं हे ट्विट वाचल्यानंतर अनेकांनीच तो प्रसंग डोळ्यांपुढे उभा केला. शाह यांनी लिहिलं, 'मी त्यांना अतिशय अभिमानानं हसत उत्तर दिलं, ...कारण आम्ही भारतीय आहोत. हे मी त्यावेळी म्हटलं जेव्हा Heathrow विमानतळावरील कर्मचारी त्याच्या सहकर्मचाऱ्याला विचारत होते, यांना फर्स्ट क्लासनं प्रवास परवडतो तरी कसा?'
'हम साथ साथ है', 'मैं हूं ना', 'ओम शांति ओम' आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या शाह यांनी केलेल्या या ट्विटला 12 हजारांहून अधिक लाईक्स आणि एक हजारांहून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. इथं गंमत म्हणजे शाह यांनी केलेल्या या ट्विटवर Heathrow विमानतळाच्या अकाऊंटवरूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
'सुप्रभात... आम्ही घडलेल्या या प्रसंगासाठी आपली क्षमा मागतो. तुम्ही आम्हाला मेसेज करु शकता का?'
Good morning, we're sorry to hear about this encounter. May you DM us?
— Heathrow Airport (@HeathrowAirport) January 3, 2023
बस्स, मग काय आता खुद्द 'गोरे साहेब'च शाह यांच्यापुढे नमले म्हटल्यावर ट्विटरवर या विषयावरून बऱ्याच चर्चा झाल्या. अनेकांनीच यावर आपली मतं आणि स्वत:सोबत घडलेले अनुभवही सांगण्यास सुरुवात केली. आज काळ इतका पुढे आलेला असतानाही भारतीयांना अशी वागणूक मिळणं ही निराशाजनक बाब आहे हे मात्र खरं.