Sayaji Shinde Health News : लोकप्रिय अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या हृदयात दुखत असल्याची तक्रार त्यांनी केल्यानंतर त्यांना काल 11 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपासनी केल्यानंतर लगेच त्यांची अँजिओग्राफी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, आता त्यांची प्रकृती ही स्थिर असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे.
सयाजी शिंदे यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होती. त्याविषयी तिथले डॉक्टर सोमनाथ साबळे यांनी 'झी 24तास' शी बोलताना सांगितलं की "गेल्या आठवड्यात सयाजी शिंदे यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी त्वरीत काही रुटीन चाचण्या केल्या. 2D इकोमध्ये त्यांच्या हृदयाच्या एका छोट्या भागाची हालचाल कमी असल्याचं जाणवलं. हे पाहता काल त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हृदयाच्या 3 पैकी 2 रक्तवाहिन्या पूर्णपणे नॉर्मल होत्या. उजव्या रक्तवाहिन्याच्या तोंडाकडे 99 टक्के ब्लॉक आढळला. शरीराकडून त्यांना वेगळे मेसेज मिळत होते. त्यामुळे त्यांनी तातडीनं तपासण्या करून घेतल्या. या तपासण्यात जो दोष आढळला तो आम्ही तातडीने दुरूस्त केला. आता ते पूर्णपणे बरे आहेत."
दरम्यान, त्यांना दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातं आहे. सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीविषयी कळताच त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : 'हा साधेपणा नाही तर...', सलमान खाननं छिद्र असलेला टी-शर्ट पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
सयाजी शिंदे यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी फक्त मराठी चित्रपटांमध्ये नाही तर बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. त्यांचे अनेक चित्रपट ही सुपरहिट ठरले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत फक्त एकाच भाषेतील ते चित्रपट करत नाही तर कन्नड, तमिळ, मल्याळम आणि तेलगू या भाषांमध्ये त्यांनी काम केलं आहे. कामाशिवाय सयाजी शिंदे त्यांच्या झाडांवर असलेल्या प्रेमामुळे चर्चेत असतात. त्यावरून त्यांनी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाची निर्मिती केली होती.