Seema Deo Death News: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे वयाच्या 81 वर्षी निधन झाले आहे. बांद्रा येथील लिलावती रूग्णालयात आज (24 ऑगस्ट) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या तीन वर्षांपासून त्या स्मृतीभंश (एलझायमर) या आजारानं ग्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात त्यांची दोन मुलं अंजिक्य देव आणि अभिनय देव तसेच दोन सुना व नातवंडं आहेत. अंजिक्य देवही लोकप्रिय अभिनेते असून अभिनय देवही लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माते आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सुंदर चेहरा, मनमिळावू स्वभाव, गोड हास्य आणि दर्जेदार अभिनय यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मराठी रसिक प्रेक्षक चाहते होते. आपल्या परिवाराच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानं त्यांनी सिनेचित्रपटसृष्टीतून काही काळासाठी ब्रेक घेतला होता. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी ही आजही एव्हरग्रीन आहे. गेल्या 59 वर्षांचा त्यांचा सहवास होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या अकाली जाण्यानं पोकळी निर्माण झाली होती. त्यापाठोपाठ आता रमेश देव यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचेही आज निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीत शोक व्यक्त केला जातो आहे.
2020 साली ऑक्टोबरमध्ये अभिनेते अंजिक्य देव यांनी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना स्मृतीभंश झाल्याची माहिती दिली होती. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली होती.
जगाच्या पाठीवर (1960), वरदक्षिणा (1962) ,सरस्वतीचंद्र (1968) तसेच 'आनंद' आणि 'ड्रीम गर्ल' या हिंदी चित्रपटांतूनही अभिनय केला आहे. 'अपराध' (1969) हा सीमा देव आणि रमेश देव यांचा गाजलेला चित्रपट होता.
रमेश देव आणि सीमा देव ही महाराष्ट्राची लाडकी जोडी होती. त्यांनी त्यांच्या 50 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त परत एकदा लग्न केले होते. घरच्या घरी त्यांनी हा सोहळा साजरा केला होता. तेव्हा त्यांच्या लग्नाचे हे गोड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सीमा देव यांना 'झी जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले होते. रमेश देव आणि सीमा देव यांनी 'झी मराठी'वरील 'कानाला खडा' या कार्यक्रमात उपस्थितीत लावली होती. त्याचसोबत त्यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातूनही हजेरी लावली होती.