Seema Haider MNS : पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर ही सतत चर्चेत आहे. काही झालं तरी तिचा विषय हा संपत नाही आहे. अशात तिच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जाते. अमित जानी सीमावर चित्रपट करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्या चित्रपटाचं नाव कराची टू नोएडा असं असेल असं म्हटले जाते. या सगळ्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इशारा दिला आहे. अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हा इशारा दिला आहे.
अमेय खोपकर फेसबूकवर पोस्ट शेअर करत म्हणाले की 'पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच..!!'
सीमा पाकिस्तानातून, दुबई आणि त्यानंतर नेपाळ आणि मग त्याच मार्गानं भारतात आली. सीमा आणि सचिन हे दोघे ही ग्रेटर नोएडाच्या एका गावात राहत आहेत. त्या दोघांनी मार्च महिन्यात नेपाळमध्ये लग्न केलं. तर सीमानं धर्मपरिवर्तन केल्याचा खुलासा केला आहे. तिची सोशल मीडियावर रोज चर्चेचा विषय ठरते.
हेही वाचा : पूजा सावंतला जास्त चित्रपट न मिळण्याचं अजब कारण पाहिलं का? स्वत: अभिनेत्रीनंच केला खुलासा
सीमाच्या आयुष्यावर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर त्याशिवाय सीमाला चित्रपटात अभिनय करण्यासाठी देखील अनेक ऑफर मिळाल्या आहेत. सीमाला राजस्थानमधील उदयपूर येथील शिंपी कन्हैया लालच्या हत्येवर आधारीत चित्रपटात काम करण्यासाठी ऑफर मिळाली आहे. या चित्रपटात सीमा ही भारतीय रॉ एजंटच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या चित्रपटाचं नाव ‘ए टेलर मर्डर स्टोरी’ असे असेल असे म्हटले जात आहे. तर गेल्या आठवड्यात सीमानं चित्रपटासाठी ऑडिशनही दिल्याचं म्हटलं जातं.
दरम्यान, सीमा आणि सचिनच्या आयुष्यावर आणि राजस्थानच्या उदयपूर येथील कन्हैयालालच्या आयुष्यावर चित्रपट येणार आहेत. या दोन्ही चित्रपटांची घोषणा करणाऱ्या अमित जानी यांना त्यानंतर सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.