मुंबई : अनेकदा आपण मस्करीत अशा गोष्टी करून जातो ज्यामुळे समोरच्या माणसाच मन दुखावलं जाईल. आपल्याला माहितच आहे सध्या नाना पाटेकर - तनुश्री दत्ताचं प्रकरण खूप चर्चेत आहे. तनुश्रीने नानांवर लावलेले आरोप इतके गंभीर आहेत की, त्यामुळे संपूर्ण इंडस्ट्री एका तणावाखाली आहे. कलाकार 2 भागात विभागले गेले आहेत अनेकांनी तनुश्रीला पाठिंबा दिला आहे तर काहींनी या प्रकरणाची कसून चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. असं असताना एक कलाकार मात्र या संवेदनशील विषयाकडे असंवेदनशीलपणे पाहत असल्याचं समोर आलं आहे.
हा कलाकार कुणी साधा कलाकार नसून सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता असून तो एका मुलीचा बाप आहे. यामुळे या विषयाचं गांभीर्य न समजता या प्रकरणाकडे अगदी सहज पाहिलं जातं आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून 66 वर्षांची शक्ती कपूर आहे.
शक्ती कपूर हे बॉलिवूडमधील सक्रिय अभिनेता आहेतच तसेच ते अभिनेत्री श्रद्धा कपूरचे वडिल आहेत. एका वडिलाने आपल्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीसोबत सेक्सुअल हरॅशमेंट झाल्यावर त्याने असं वक्तव्य करणं शोभत नाही. मीडियाने शक्ती कपूरला या प्रकरणाबाबत विचारलं असतं, त्यावर शक्ती कपूर हसले आणि म्हटलं की, 10 वर्षांपूर्वीचं मला काही माहित नाही सर. 10 वर्षांपूर्वी मी लहान मुलगा होतो. आणि यानंतर हास्याचा एक कल्लोळ उठला. हा व्हिडिओ आता समोर आला आहे.
#WATCH:I don't know anything about this case. This was ten years back, I was a kid back then: Shakti Kapoor on #TanushreeDutta's harassment allegations against Nana Patekar. (2/10/2018) pic.twitter.com/FxD7LHL6MM
— ANI (@ANI) October 3, 2018
असभ्य वर्तणूकीचे आरोप केल्याप्रकरणी अभिनेते नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हिला कायदेशीर नोटीस पाठवल्याचं वृत्त सोमवारी समोर आलं होतं. पण, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने मात्र आपल्याचा अशी कोणतीच नोटीस मिळाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'मला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. जेणेकरुन माझ्यासारख्यांचा आवज दाबता येईल', असं तनुश्री म्हणाली.