मुंबई : कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता रजनीकांत यांच्या 'पेट्टा' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरचा व्हिडिओ पोस्ट केल्यापासून तो प्रचंड व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. कार्तिक सुब्बराज दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीसुद्धा थलैवासोबत स्क्रीन शेअर करताना दिसत आहे.
ट्रेलरविषयी सांगावं तर, पहिल्या दृश्यापासून ते अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत सर्वत्र रजनी, रजनी आणि रजनीच अशीच दृश्य आणि एकंदरच थलैवाची जादू पाहायला मिळत आहे. चष्मा घालण्याचा रजनीकांत यांचा अनोखा अंदाज, त्यांचा रुपेरी पडद्यावरचा वावर असं एकंदर दृश्य पाहायला मिळत आहेत.
पोंगलच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटातील रजनीकांत यांचा लूक पाहता एखाद्या तरुण अभिनेत्यालाही लाजवेल असाच त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे आता 'पेट्टा'च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळवणारा हा अभिनेता त्याची छाप पाडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रजनीकांत यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात, अभिनेत्री त्रिशाही झळकणार आहे. शिवाय दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असणाऱ्या अफवलातून साहसदृश्यांची भर या चित्रपटाला चार चाँद लावणार असल्याचंही कळत आहे.
'पेट्टा' हा चित्रपट बऱ्याच कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. कार्तिक सुब्बराज या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रजनीकांत यांच्यासोबत काम करत आहे. तर सिमरन, त्रिशा आणि वियत सेतूपती हे कलाकारही पहिल्यांदाच थलैवासोबत स्क्रीन शेअर करत आहेत. त्यामुळे कलाकारांचं हे पहिलंवहिलं समीकरण चित्रपटासाठी कितपत फायद्याचं ठरतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.