सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) सध्या महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. यादरम्यान काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर याच्या लग्नाला अनेक बॉलिवूड अभिनेते आणि गायकांनी हजेरी लावली होती. या सेलिब्रेटींना ही हजेरी लावणं महागात पडू शकतं.
सौरभ चंद्राकर याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात संयुक्त अरब अमिराती येथे लग्नबंधनात अडकला होता. या लग्नाला अभिनेता टायगर श्रॉफ, सनी लिओनी यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रेटींनी हजेरी लावली. गायिका नेहा कक्करने या लग्नात गाणी सादर केली.
ईडीच्या रडारवर जे सेलिब्रेटी आहेत त्यामध्ये आतिफ असलम, राहत फतेह अली खान, अली असगर, विशाल ददलानी, टायगर श्रॉफ, एली अवराम, भारती सिंग, सनी लिओनी, भाग्यश्री, क्रिती खरबंदा, नुसरत भरुचा आणि कृष्णा अभिषेक यांचा समावेश आहे.
सौरभ चंद्राकर याच्या लग्नाचा एक व्हिडीओ समोर आला असून, त्यात हे सर्व सेलिब्रेटी दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व अभिनेते आणि गायकांना मुंबईतील या कंपनीने दिलेलं मानधन पकत करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं.
महादेव अॅपच्या इतर प्रवर्तकांनी चंद्राकरच्या लग्न समारंभावर सुमारे 200 कोटी रुपये रोख खर्च केले अशी माहिती आहे. कुटुंबातील सदस्यांना नागपूरमधून यूएईला नेण्यासाठी खासगी जेट भाड्याने घेण्यात आली होती.
सक्तवसुली संचालनालयाने मिळवलेल्या डिजिटल पुराव्यांनुसार, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला हवालाद्वारे 112 कोटी रुपये वितरित करण्यात आले. तर हॉटेल बुकिंगसाठी 42 कोटी रुपये रोख स्वरूपात दिले गेले.
दरम्यान ईडीने महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणी 8 अंगडिया कार्यालयांवर धाड टाकत 417 कोटींची संपत्ती जप्त केली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिली आहे.
सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांची कंपनी दुबईमधून कार्यरत होती. त्यांनी कथितपणे ऑनलाइन बुक बेटिंग अॅपचा वापर नवीन वापरकर्त्यांची नोंदणी करण्यासाठी, वापरकर्ता आयडी तयार करण्यासाठी आणि बेनामी बँक खात्यांच्या स्तरित वेबद्वारे पैसे लाँडर करण्यासाठी करत होती, असा आरोप करण्यात आला आहे.
"ईडीने महादेव अॅपशी संबंधित कोलकाता, भोपाळ, मुंबईसारख्या शहरातील मनी लाँडरिंग नेटरवर्किंगवर धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात पुरावे सापडले असून, 417 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे," अशी माहिती ईडीने दिली आहे.
ईडीच्या तपासात महादेव ऑनलाइन बूक अॅप युएईमधील मुख्य कार्यालयातून कार्यरत होतं हे समोर आलं आहे.