मुंबई : 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात रामायणाशी संबंधित प्रश्नाचं उत्तर न देता आल्यामुळे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चांगलीच ट्रोल झाली. ज्यानंतर सर्व स्तरांतून तिच्यावर निशाणा साधण्यात आला. मुख्य म्हणजे आता राजकीय वर्तुळातूनही याविषयीच्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.
उत्तर प्रदेशचे मंत्री सुनील भारला यांनी सोनाक्षीवर निशाणा साधत तिला टोला लगावला आहे. 'धन पशू', म्हणत त्यांनी तिच्यावर निशाणा साधला. या मंडळींसाठी फक्त पैसाच महत्त्वाचा असल्याची बोचरी टीकाही त्य़ांनी केली.
'हल्लीच्या या युगात या मंडळींला फक्त पैसाच महत्त्वाचा आहे. फक्त पैसे कमावणं आणि ते स्वत:वरच उधळणं याचीच त्यांना काळजी असते. इतिहास आणि देवधर्माविषयी त्यांना काहीच ज्ञान नसतं. त्यांच्याकडे हे जाणून घेण्याचा वेळही नसो. हे अतिशय दु:खदायक आहे', असं ते म्हणाले.
मंत्रीमहोदयांच्या या टीकेला उत्तर देत आता सोनाक्षी पुन्हा एकदा व्यक्त होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सोनाक्षीचा सहभाग असणाऱ्या 'केबीसी'च्या एका भागातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये 'रामायणानुसार हनुमान कोणासाठी संजीवनी घेऊन गेले होते?', या प्रश्नाचं उत्तर न देता आलेली सोनाक्षी पाहून तिची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवण्यात आली.
अनेकांनी मीम्स शेअर करत तिच्या बौद्धीक पातळीविषयीसुद्धा वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. हा सर्व प्रकार पाहत अखेर तिने टेक उपरोधिक ट्विट केलं आणि आपल्याला आणखी कोणकोणत्या गोष्टींचा विसर पडला आहे, हेसुद्धा स्पष्ट केलं. किंबहुना याविषयीसुद्धा मीम्स तयार करुन तेही शेअर करास, असा सल्लाही तिने नेटकऱ्यांना दिला होता.