दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. मुख्य म्हणजे या रुग्णाचा कोणताही परदेश प्रवास केल्याचा इतिहास नाही. यापूर्वी केरळमध्ये मंकीपॉक्सचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. हे तिन्ही रुग्ण यूएईमधून परतले होते आणि तिथे ते एका संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. मात्र दिल्लीमध्ये सापडलेल्या व्यक्तीने कुठेही परदेशी प्रवास केल्याचं समोर आलं नाहीये.
दिल्लीत सापडलेला नवीन रुग्ण एलएनजेपी रूग्णालयात दाखल आहे. 31 वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाल्याची पुष्टी करताना आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय की, या रूग्णाचा कोणताही परदेशी प्रवास असल्याचा इतिहास नाही. म्हणजेच आतापर्यंत सापडलेल्या चार रुग्णांपैकी ही अशी पहिलीच घटना आहे, ज्यांचा कोणताही परदेशी प्रवास इतिहास नाही. या रुग्णाला खूप ताप आणि त्वचेवरील जखमांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
यापूर्वी 14 जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला होता. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी स्वतः मंकीपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी केली होती. हा पहिला रूग्ण यूएईहून परतला होता. मंकीपॉक्सची लक्षणं दिसू लागल्याने त्याला केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
या प्रकरणाच्या अवघ्या चार दिवसांनंतर म्हणजेच 18 जुलै रोजी केरळमध्ये मंकीपॉक्सच्या दुसऱ्या प्रकरणाची नोंद झाली. ही व्यक्तीही दुबईहून परतली होती. यानंतर 22 जुलै रोजी तिसरं प्रकरण समोर आलं. या तिन्ही प्रकरणांमध्ये युएई कनेक्शन असल्याचं उघड झालं. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवलं जातंय.
जगभरात वेगाने पसरणाऱ्या मंकीपॉक्समुळे जागतिक आरोग्य संघटनेने शनिवारी जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी सांगितलं की, मंकीपॉक्सचा उद्रेक हा आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय आहे.