बीजिंग : कोरोनाचा फैलाव जगामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे हा आजार नष्ट करण्यासाठी अनेक देश लस शोधत आहे. आता चीनने कोरोना व्हायरसवरील (coronavirus) तिसऱ्या लसीवर वैद्यकिय चाचणी करण्याची परवानगी दिली आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण ९६ रुग्णांना ही लस देण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे आता चीनने कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी तीन लसींची चाचणी करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामध्ये एक लस चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) विकसित केली आहे.
अधिकृत शिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, वुहान इंस्टीट्यूट ऑफ बायोलॉजिकल प्रॉडक्ट्सने चायना नॅशनल फार्मास्युटिकल ग्रुप (सिनोफार्म) अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या आपल्या लसीची आणि वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (डब्ल्यूआईवी) ने आपल्या वॅक्सीनची वैद्यकिय चाचणी करण्यास करण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी डब्ल्यूआईवी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. डब्ल्यूआईवी संस्थेच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक वाढू शकेल असा आरोप अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे उच्च अधिकारी यांच्याकडून करण्यात आला होता.
दरम्यान, या सर्व प्रकरणी अमेरिकेने तपासणीची मागणी केली होती. पण डब्ल्यूआईवी संस्थेने हे सर्व आरोप बिनबूडाचे असल्याचे सांगत अमेरिकेकडून करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
चीनची औषध कंपनी सिनोफर्मच्या म्हणण्यानुसार, वैद्यकिय चाचणीच्या पहिल्या टप्प्यामध्ये २३ एप्रिल पर्यंत तीन वेग-वेगळ्या वयोगटातील ९६ रुग्णांना ही लस देण्यात आली आहे. आतापर्यंत ज्या रुग्णांना ही लस देण्यात आली आहे, त्यांच्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम झालेला नाही तर काहींना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.