कोची : 'ग्लोबल हॅन्डवॉशिंग डे' च्या निमित्ताने केलेल्या सर्वेक्षणातून भारतातील ग्रामीण भागात हात धुण्यासंबंधित ज्ञानाचा अभाव असल्याचे आढळून आले आहे. वॉटर एड इंडियाच्या नव्या अभ्यासात 'स्पॉटलाइट ऑन हॅन्डवॉशिंग इन रुरल इंडिया' वर भर देण्यात आला आहे. त्यानुसार पाच वेळा हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. शौचक्रियेनंतर, मुलांचे शौच साफ केल्यानंतर, तान्ह्या किंवा लहान मुलांना दूध पाजताना किंवा काही भरवताना, काही खाण्याआधी आणि जेवण बनवण्याआधी हात साबणाने स्वच्छ धुणे महत्त्वाचे आहे. यामुळे डायरियाची समस्या ४७ टक्क्यांनी कमी झाल्याचे अनुमान आहे.
हात धुण्यासंदर्भातील ही माहिती, जागरूकता बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि ओडिसा राज्यातील ग्रामीण भागात देण्याची आवश्यकता आहे. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ज्या घरात पाच वर्षाहून कमी वयाची मुले आहेत तिथे स्वच्छता कमी आहे. तसंच फक्त २६.३ % महिला मुलांना भरवण्यापुर्वी हात धुतात. तर १४.७ % महिला मुलांना दूध पाजण्यापूर्वी हात धुतात.
१६.७ % महिला मुलांचे शौच साफ केल्यानंतर हात धुतात आणि १८.४ % शौचक्रियेनंतर हात स्वच्छ करतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, २०१५ मध्ये डायरियामुळे दररोज ३२१ मुलांचे मृत्यू झाले आहेत. आणि भारतातील पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूचे हेच दुसरे कारण आहे.