मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला. मात्र आता लाटेचा प्रभाव काहीसा कमी झाला असून काही राज्यांमध्ये हळू-हळू अनलॉक करण्यास सुरुवात होतेय. दरम्यान तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे अनलॉकमध्ये नागरिकांना जास्त सूट देण्यापूर्वी सेरो सर्व्हेलन्स करणं उपयुक्त ठरेल. सेरो सर्व्हेलन्सच्या माध्यमातून किती लोकांमध्ये कोरोना व्हायरसविरोधात अँटीबॉडीज निर्माण झाले आहेत हे समजण्यास मदत होते. मात्र सेरो सर्व्हेलन्स कसा करतात हे आज आपण जाणून घेऊया.
सेरो सर्व्हो म्हणजे सेरो सर्व्हेलन्समध्ये लोकसंख्येमध्ये व्हायरसविरोधात किती अँन्टीबॉडीज तयार झाल्या आहेत याची चाचणी करण्यात येते. जेव्हा एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरावर अटॅक करतो त्यावेळी शरीर आपोआप त्याविरोधात अँटीबॉडी तयार करतं. हे अँटीबॉडी म्हणजे विशेष प्रकारचं प्रोटीन असतं आणि ते व्हायरस तसंच बॅक्टेरियापासून शरीराचं रक्षण करतं.
कोरोना व्हायरसबाबत म्हटलं तर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज सापडले म्हणजे त्या व्यक्तीला संक्रमणाचा धोका फार कमी असतो. या अंटीबॉडीजच्या चाचणीला सेरो सर्व्हे म्हटलं जातं.
ही एक सेरोलॉजी टेस्ट असते. यामध्ये व्यक्तीच्या रक्त घेऊन त्यामधून सेल्स आणि सीरम वेगळं केलं जातं. अँटीबॉडी सीरममध्ये सापडते. या सीरममध्ये कोरोना व्हायरसविरोधात अँटीबॉडी तयार झाली आहे की नाही याची तपासणी केली जाते.
अँटीबॉडीज दोन पद्धतींच्या असतात. एक IgM आणि दुसरी IgG. आयजीजी अँटीबॉडी शरीरात दिर्घकाळ राहते आणि व्हायरस विरोधात मेमरी सेल्स म्हणून पण काम करतं. आयजीजी अँटीबॉडीज व्यक्तीच्या शरीरात 4-6 महिन्यांपर्यंत राहते.
अनेक लोकांना कोरोनाचं संक्रमण होऊन देखील त्यांना लक्षणं दिसत नाही. म्हणजेच कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतरही ती व्यक्ती आजारी पडत नाही. आता जितक्या अधिक लोकांमध्ये अँटीबॉडी निर्माण झाली तेवढा कोरोनाचा धोका कमी झाला. यासाठी सेरो सर्व्हे कोरोनाच्या लढ्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.