नवविवाहित वधू लग्नानंतर 20 तासातच सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या अलवर येथे ही घटना घडली आहे. सासरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. सासरचे लोक आणि पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. तरुणाने विवाहसंस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये राहणाऱ्या या मुलीशी लग्न केलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, एनईबी ठाणे क्षेत्रातील रणजीत नगर येथे राहणाऱ्या राजकुमार शर्मा यांनी आपला मुलगा हेमंतच्या लग्नासाठी जयपूरमधील एका विवाहमंडळाशी संपर्क साधला होता. त्यांच्या सांगण्यानुसार जयपूरच्या जैन मंदिर गलता गेटसमोर सुरक्षारक्षकाची नोकरी कऱणाऱ्या मनोहर लालयांची भेट त्यांनी घेतली. 10 जानेवारीला मनोहर लालने राजकुमार यांची भेट बनवारी लालशी करुन दिली.
बनवारी लाल झारखंडच्या धनबादचा राहणारा आहे. तो बिहार आणि झारखंडमधील मुलीचं लग्न लावण्याचं काम करतो. बनवारीने बिहारमध्ये राहणाऱ्या निशा नावाच्या मुलीचा फोटो राजकुमारला दाखवला. मुलीचा फोटो पाहिल्यानंतर राजकुमार यांनी मुलाचं लग्न तिच्याशी लावण्याचा निर्णय घेतला. 16 जानेवारीला लग्न करण्याचं ठरलं.
लग्नासाठी जयपूरमधील एक हॉटेल बूक करण्यात आलं होतं. राजकुमार 16 जानेवारीला मुलाची वरात घेऊन जयपूरमध्ये पोहोचले. लग्न लागल्यानंतर मुलीच्या आईने राजकुमार यांच्याकडे पतीच्या उपचारासाठी 2 लाख रुपये उधारीवर मागितले. राजकुमार यांनी सर्वांसमोर त्यांना 2 लाख रुपये दिली. लग्न लागल्यानंतर 17 जानेवारीला सकाळी 5 वाजता सगळे घऱी पोहोचले.
रात्री सर्व नातेवाईक झोपले होते. रात्री 1 वाजता हेमंतने नवरी रुममध्ये नसल्याचं सांगितलं. यानंतर घऱातून 30 हजार रुपये, मोबाईल, सोने-चांदीने गायब झाले असल्याचं उघड झालं. राजकुमार यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. दुसरीकडे नातेवाईकांच्या सहाय्याने तेदेखील नवरीमुलीचा शोध घेत आहेत. याशिवाय ज्यांनी लग्नासाठी मध्यस्थी केली त्यांचाही शोध घेतला जात आहे. पण अनेकांचे फोन बंद आहेत.
सहाय्यक उपनिरीक्षक मोहनलाल यांनी सांगितलं आहे की, राजकुमार शर्मा यांन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हेमंत आणि निशा यांचं जयपूरमध्ये लग्न लागलं होतं. नवरीमुलगी लग्नानंतर रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली आहे. तरुणीच्या फोटोच्या आधारे इतर पोलीस ठाण्यांनाही कळवण्यात आलं आहे. लवकरच आरोपींना अटक केलं जाईल.