Rahul Gandhi Video: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच दिल्लीमधील केवेंटर्स स्टोअरला भेट दिली. यादरम्यान त्या इमारतीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ महिलेने राहुल गांधींना आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं. राहुल गांधींनीही यावेळी आपुलकीने हे आमंत्रण स्विकारलं आणि आपण फक्त 2 मिनिटं थांबणार असल्याचं सांगितलं. त्यावर आजीबाईंनीही होकार दिला. पण यानंतर असं काही घडलं जे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. याचं कारण राहुल गांधी त्यांच्या घरी पोहोचले असता घराची चावीच हरवलेली होती. यानंतर तिथे उपस्थित महिलांनाही हसू आवरत नव्हतं. हा गोड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राहुल गांधी स्टोअरमध्ये आलेल्या एका वयस्कर महिलेशी संवाद साधतात. महिला त्यांना सांगते की, मी त्याच इमारतीत राहते. यानंतर ती त्यांना आपल्या घरी बोलावते. राहुल गांधी हसत सांगतात की, "मी दोन मिनिटांसाठी येईन". पण यानंतर एक मजेशीर प्रकार घडतो. महिलेला घरी पोहोचल्यानंतर चावीच नसल्याचं लक्षात येतं. यानंतर तिथे जे काही होतं पाहिल्यानंतर हसू अनावर होतं.
दरम्यान राहुल गांधींनी दुकानात आलेल्या ग्राहकांशी संवाद साधला आणि तिथे कोल्ड कॉफीही बनवली. राहुल गांधी यांनी केव्हेंटर्सच्या सह-संस्थापकांशी त्यांच्या व्यवसायाबद्दल, आव्हानांबद्दल आणि भविष्यातील नियोजनाबद्दलही चर्चा केली. त्यांनी हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे.
How do you shake up a legacy brand for a new generation and a new market?
The young founders of Keventers shared some valuable insights with me recently.
Play-fair businesses like Keventers have driven our economic growth for generations. We must do more to support them. pic.twitter.com/LSdiP8A9bQ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 9, 2025
राहुल गांधींनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, "जुनी कंपनी नवीन पिढी आणि नवीन बाजारपेठेसाठी कशी तयार केली जाऊ शकते? केव्हेंटर्सच्या तरुण संस्थापकाने अलीकडेच मला याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. केव्हेंटर्ससारख्या कंपन्या आपल्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाच्या आहेत. त्या उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावत असताना, आपण त्यांच्यासाठी आपला पाठिंबा वाढवला पाहिजे."
जेव्हा कर्मचाऱ्यांनी राहुल गांधींना विचारलं की त्यांना कोल्ड कॉफी कशी बनवली जाते ते पहायचे आहे का? तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की, "नाही, मी स्वतः बनवणार." यानंतर, राहुल गांधींनी दूध, आईस्क्रीम मिक्सरमध्ये टाकून केव्हेंटर्सच्या सिग्नेचर बाटलीत कॉफी ओतली. राहुल गांधींचा आत्मविश्वास आणि ग्राहकांशी असलेला संवाद पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.
राहुल गांधी केव्हेंटर्सचे सह-संस्थापक अमन अरोरा आणि अगस्त्य डालमिया यांच्याशी व्यवसायाबद्दल बोलताना दिसत आहेत. केव्हेंटर्सच्या एका सह-संस्थापकाने त्यांना गुंतवणूक योजनांबद्दल विचारले. यावर राहुल गांधी हसत हसत म्हणतात, "मी केव्हेंटर्सकडे पाहत आहे आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल विचार करत आहे."