चोरीच्या घटना आपण पाहिल्या असतील. काही घटनांमध्ये चोर आर्थिक विवंचनेतून चोरीचा मार्ग स्वीकारतात. मात्र नागपूरच्या या चोराचे प्रताप पाहून पोलीसही चक्रावले आहेत. केवळ बडेजावपणासाठी चोरट्यानं चो-यामा-या करायला सुरूवात केली. मात्र हुडकेश्वर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हातात आयफोन, ब्रॅण्डेड कपडे, महागडं घड्याळ, आलिशान कारने फिरणे महागड्या जिममध्ये जाणं ही लक्झरी लाईफस्टाईल एका चोराची आहे हे सांगितल्यावर कदाचित तुमच्या त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र नागपूर पोलिसांनी अटक केलेल्या एका अट्टल चोरट्याची ही लाईफस्टाईल आहे. रजनीकांत नावाच्या एका चोरट्याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे शौक पाहिल्यावंर पोलीसही हैराण झाले.या चोरट्याची चोरीची पद्धतीही हटके होती. लग्नघर किंवा मोठे समारंभ असलेल्या घरांना टार्गेट करायचा. लग्नानंतर रिसेप्शन करता गेलेल्या कुटुंबाच्या घरी रेकी करून तो चोरी करायचा.
या चोरट्याच्या नावाने छत्तीसगड, चंद्रपूर, भंडाऱ्यात चोरीचे 12 गुन्हे दाखल आहेत. नागपुरात डिसेंबर महिन्यात झालेल्या एका चोरी प्रकरणात सीसीटीव्हीच्या आधारे तपास करताना पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला भोपाळ येथून अटक केली.
नागपूरमधला हा चोर प्रचंड धुर्त होता. आपल्या बडेजावमध्ये त्याने अनेक चोऱ्या पचवल्याही होत्या. मात्र गुन्हेगार कितीही धुर्त असला तरी पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही हेच खरं आहे.