नवी दिल्ली: आधार कार्डाच्या सुरक्षितेविषयी हमी देण्यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी स्वीकारलेले आव्हान सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय आहे. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. आर.एस. शर्मा यांनी आपला १२ आकडी आधार क्रमांक ट्विटरवर दिला होता. आधार क्रमांकाच्या आधारे वैयक्तिक माहिती काढून दाखवा, असे खुले आव्हान त्यांनी दिले होते.
त्यानंतर फ्रान्समधून एका हॅकरने त्यांचा डेटा हॅक केल्याचा दावा केला होता. मात्र, हॅकरनं प्रसिद्ध केलेली माहिती आधार डेटाबेसच्या सर्व्हरवरून घेण्यात आली नसल्याचा दावा युआयडीएआयने केला आहे. त्यामुळे आधारच्या विश्वासर्हतेवर आणखी एक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
ही माहिती पहिल्यापासूनच सार्वजनिक होती. दशकभरापासून शर्मा हे सार्वजनिक क्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे त्यांची माहिती ही गुगल आणि इतर वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्यामुळे त्याच्या आधारची माहिती लीक झाल्याचा करण्यात आलेला दावा खोटा असल्याचे युआयडीएआयने सांगितले.