पतीने लग्नात मिळालेल्या बाईकवरुन तोडले ट्राफिकचे नियम; कारण समजल्यानंतर सासरच्यांनी लावला डोक्याला हात

पत्नीवर नाराज झालेल्या पतीने तिला धडा शिकवण्यासाठी अजब पद्धत अवलंबली. लग्नात भेट म्हणून मिळालेल्या बाईकने त्याने वाहतुकीचे नियम तोडले. यामागील कारण समजल्यानंतर सासरच्यांनी डोक्याला हातच लावला.   

शिवराज यादव | Updated: Feb 9, 2025, 04:39 PM IST
पतीने लग्नात मिळालेल्या बाईकवरुन तोडले ट्राफिकचे नियम; कारण समजल्यानंतर सासरच्यांनी लावला डोक्याला हात title=

बिहारमध्ये पती-पत्नीमधील भांडणाचं एक अजब प्रकरण समोर आलं आहे. येथे एका पतीने लग्नात मिळालेल्या बाईकने वाहतुकीचे नियम तोडण्यास सुरुवात केली. बाईक पत्नीच्या नाव असल्याने चालान लागल्याचे सर्व मेसेज पत्नीच्या मोबाईलवर येत होते. पत्नीने दंडाची सर्व रक्कम भरली होती. पण जेव्हा हे थांबत नसल्याचं तिच्या लक्षात आलं तेव्हा मात्र तिने नातेवाईकांसह पोलीस स्टेशन गाठलं आणि पतीविरोधात तक्रार दाखल केली.

तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगर येथे राहणाऱ्या महिलेचं दीड वर्षांपूर्वी पाटणा येथे लग्न झालं होतं. पण लग्नानंतर दीड महिन्यातच पती आणि पत्नीमध्ये वाद होण्यास सुरुवात झाली होती. यानंतर दोघे विभक्त झाले होते. पत्नी माहेरी मुझफ्फरपूर येथे आली आणि तक्रार दाखल केली. 

यानंतर पतीने लग्नात भेट म्हणून मिळालेल्या बाईकने वाहतुकीचे नियम तोडण्यास सुरुवात केली. बाईक पत्नीच्या नावे असल्याने चालान तिच्या नावेच येऊ लागले. एक-दोन वेळा तिने चालान भरला, पण त्यानंतरही चालान येत असल्याने तिने पतीला बाईक परत करण्यास सांगितलं. पण पतीने घटस्फोटाचा निर्णय येईपर्यंत बाईक देण्यास नकार दिला. 

महिलेने सांगितलं की, मागील तीन महिन्यात पोलिसांनी चार वेळा चालान काढलं आहे. सुरुवातीला तर दंड भरला, पण आता मात्र जेव्हा तो वाढू लागला तेव्हा तक्रार दिली. 

महिलेने पाटणा वाहतूक पोलीस  स्थानकात तक्रार केली असता, त्यांनी तिला स्थानिक पोलीस स्थानकात जाण्यास सांगितलं. महिला आपल्या वडिलांसह पोहोचली आणि तक्रार दाखल केली. यावेळी तिला बाईक अजूनही पतीकडे आहे हे कसं काय सिद्ध करु शकतेस अशी विचारणा करण्यात आली. पोलिसांनी तिला एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं, ज्यामध्ये पती आपल्या बाईकचा वापर करत असल्याला दुजोरा दिला जाईल. 

पोलीस ठाण्याचे अध्यक्ष रवी गुप्ता यांनी सांगितलं की, एक महिला आणि तिच्या नातेवाईकांनी येऊन तक्रार केली की, मुलीच्या लग्नात बाईक दिली होती. आता ही केस सुरु आहे. बाईक मुलाकडे आहे जी मुलीच्या नावे आहेत. याप्रकरणी तपास सुरु आहे.