Naomika Saran Bollywood Debut: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांची नात नाओमिका सरन ही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. नाओमिका ही ‘स्काय फोर्स’ या अक्षय कुमारच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये दिसली होती. यानंतर ती चाहत्यांमध्ये चर्चेत असल्याचं दिसत आहे. अशातच, नाओमिका आता बॉलिवूडमधील चित्रपटात डेब्यू करणार असल्याची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, नाओमिका आता मॅडॉक फिल्म्सच्या चित्रपटात झळकणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मॅडॉक फिल्म्सचा या आगामी चित्रपटाचे निर्माते दिनेश विजान असणार आहेत. जगभरात 857 कोटींची गडगंज कमाई करणाऱ्या श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' हा सुपरहीट चित्रपट त्यांनी बनवला होता. नाओमिका ज्या चित्रपटात डेब्यू करण्याची चर्चा रंगत आहे तो मॅडॉक फिल्म्सचा चित्रपट पंजाबी सिनेमाचे सुप्रसिद्ध निर्देशक जयदीप सिद्धू दिग्दर्शित करणार आहेत. जयदीप यांनी ‘किस्मत’, ‘शदा’ आणि ‘जट्ट एंड जूलियट 3’ अशा बऱ्याच ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, ‘सांड की आंख’ आणि ‘श्रीकांत’ अशा बॉलिवूड चित्रपटांतील संवाद लिहिले असून ते पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
रिपोर्टनुसार, मॅडॉक फिल्म्सचा हा कॉमेडी-रोमँटीक चित्रपट असणार आहे. तसेच, या चित्रपटात नाओमिका ही अभिषेक बच्चनचा नातू अगस्त्य नंदासोबत झळकणार आहे. अगस्त्य नंदाने 2023 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या जोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ या चित्रपटात डेब्यू केला होता. अगस्त्यने याआधी मोठ्या पडद्यावरील चित्रपटात काम केले नसून आता त्याचा हा आगामी चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाबद्दल अधिकृत माहिती समोर आली नाही.
नाओमिका सरन ही बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाची लहान मुलगी रिंकी खन्नाची मुलगी आहे. रिंकीने सुद्धा एकेकाळी बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अभिनय कार्यक्षेत्रात तिला यश मिळालं नाही. यानंतर ती सिनेसृष्टीपासून दूर राहिली आणि व्यावसायिक क्षेत्रातच आपली ओळख निर्माण करु लागली. रिंकीचे पती समीर सरनसुद्धा एक व्यावसायिक आहेत. आता रिंकीची मुलगी नाओमिका सरन आपल्या आईच्या पावलावर पाऊल टाकून बॉलिवूड सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगत आहे. नाओमिकाच्या बॉलिवूडमधील चित्रपटातील डेब्यूला घेऊन चाहत्यांमध्ये देखील प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.