लष्करात ३० वर्षे काम केल्यावर त्यांना सिद्ध करावे लागत आहे नागरिकत्व

भारतीय लष्करात ३० वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या जेसीओ मोहम्मद अजमल हक यांना आता नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. मोहम्मद अजमल हक यांच्यावर आरोप झाला आहे की, भारताचे नागरिक नाहीत आणि भारतात ते अवैधरित्या राहात होते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 1, 2017, 03:53 PM IST
लष्करात ३० वर्षे काम केल्यावर त्यांना सिद्ध करावे लागत आहे नागरिकत्व title=

नवी दिल्ली : भारतीय लष्करात ३० वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या जेसीओ मोहम्मद अजमल हक यांना आता नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे. मोहम्मद अजमल हक यांच्यावर आरोप झाला आहे की, भारताचे नागरिक नाहीत आणि भारतात ते अवैधरित्या राहात होते.

मोहम्मद अजमल हक यांच्यावर आरोप आहे की, ते मुळचे बांगलादेशचे आहेत आणि आतापर्यंत भारतामध्ये ते अवैधरित्या राहात होते. याबाबत आता खटला सुरू असून, या विदेशी प्रकरणाशी संबंधीत सुनवाई आता ट्राइब्यूनलमध्ये १३ ऑक्टोबर होणार आहे. मोहम्मद अजमल हक यांच्या कुटुंबियांवर ही वेळ पहिल्यांदाच आली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीयत्व सिद्ध करण्याची वेळ त्यांच्यावर तीन वर्षांपूीर्वीही आली होती. तीन वर्षांपूर्वी हक यांच्या पत्नीवर हा आरोप लागला होता. त्यानंतर यंत्रणांनी केलेल्या तपासात त्या भारतीय असल्याचे सिद्ध झाले होते.

दरम्यान, मोहम्मद अजमल हक हे सध्या आपल्या कुटुंबियांसोबत गुवाहटी येथे राहतात. भारतयी लष्करात ३० वर्षे सेवा केल्यावर ते सेवानिवृत्त झाले आहेत. इतकी वर्षे मी देशाची सेवा केल्यावर बक्षीस म्हणून मला बेकायदेशीर हिंदूस्तानी ठरवले जात आहे. माझ्या पत्नीवरही यापूर्वी हा आरोप करण्यात आला, या प्रकारामुळे मी प्रचंड दु:खी असल्याचे मोहम्मद अजमल हक यांनी म्हटले आहे.

असाम सरकारने राज्यात अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची एक यादी बनवली आहे. या यादीत मोहम्मद अजमल हक यांचेही नाव आहे. या यादीतील नावावरूनच मोहम्मद यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. २५ मार्च १९७१ नंतर कोणत्याही कागदपत्रांशिवाय भारतात आलेल्या बांग्लादेशी नागरिकांविरूद्ध असाम सरकारने ऑपरेशन सर्चलाईट सुरू केले आहे.