'मोदी या जन्मात आम्हाला पराभूत करु शकत नाहीत,' केजरीवालांचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून तुफान कमेंट्स

Arvind Kejiriwal Old Video Viral: आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपा (BJP) या आयुष्यात आपल्याला पराभूत करु शकणार नाहीत असा दावा केला होता.   

शिवराज यादव | Updated: Feb 9, 2025, 08:56 AM IST
'मोदी या जन्मात आम्हाला पराभूत करु शकत नाहीत,' केजरीवालांचा जुना व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांकडून तुफान कमेंट्स title=

Arvind Kejiriwal Old Video Viral: दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाची मागील बारा वर्षांपासून असलेली सत्ता उलथवून लावली असून, भाजपाचा मागील 26 वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. भाजपाने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने 22 जागा जिंकल्या. त्यातच अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपा या आयुष्यात आपल्याला पराभूत करु शकत नाही असा दावा केला होता. आमचा पराभव करायला त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागेल असंही ते म्हणाले होते. 

2023 मध्ये दिल्लीत झालेल्या आपच्या कार्यकर्त्यांच्या परिषदेतील या व्हिडिओमध्ये आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल म्हणत आहेत की, "त्यांचा हेतू आप सरकार पाडण्याचा आहे आणि नरेंद्र मोदीजी दिल्लीत अशा प्रकारे सरकार बनवू इच्छितात. त्यांना माहित आहे की ते निवडणुकीद्वारे आम्हाला हरवू शकत नाहीत. मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की तुम्ही या जन्मात आम्हाला हरवू शकत नाही आणि दिल्लीत आम्हाला हरवण्यासाठी तुम्हाला दुसरा जन्म घ्यावा लागेल".

भाजपाने आपल्या एक्स अकाटऊंवर अरविंद केजरीवाल यांचा हा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या त्या विधानासह काही उपहासात्मक क्लिप जोडण्यात आला आहे. तसंच व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये 'आता मिळाली का चव?' असं उपहासात्मकपणे म्हटलं आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यावर नेचकरीही व्यक्त झाले आहेत. या गर्वानेच निवडणुकीत 'आप'चा पराभव केला असं एकाने म्हटलं आहे. एका युजरने कमेंट केली आहे की, आता या जन्मात तुम्ही तुरुंगातून बाहेर येणार नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल

ऐतिहासिक विजयात, भाजपा 26 वर्षांनंतर दिल्लीत सरकार स्थापन करणार आहे. विद्यमान 'आप' आणि काँग्रेसशी झालेल्या लढतीनंतर पक्षाने 48 विधानसभा जागा जिंकल्या. 'आप'ला अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज आणि सत्येंद्र जैन यांसारख्या त्यांच्या प्रमुख नेत्यांचा पराभव पाहायला लागला आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आणि भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव केला. तथापि, काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. बहुतेक एक्झिट पोलमध्ये निवडणुकीत भाजपचा विजय अपेक्षित होता.

एक्झिट पोलमध्ये काय अंदाज होते?

1) मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार, दिल्लीत भाजपाची सत्ता येईल असा अंदाज होता. आम आदमी पक्षाला 32 ते 37, भाजपाला 35 ते 40 आणि काँग्रेसला 0-1 जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

2) चाणक्यनेही आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपालाच पसंती दिली होती. त्यांच्यानुसार, भाजपाला 39 ते 44, आपला 25 ते 28 आणि काँग्रेसला फक्त 2 ते 3 जागांवर विजय मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

3) पोल डायरीच्या एक्झिट पोलमध्येही भाजपाचीच सत्ता येईल असं सांगितलं होतं. एक्झिट पोलनुसार, भाजपाला 42 ते 50, आपला 18 ते 25 आणि काँग्रेसला 0-2 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला.