भारताच नाही तर आशियातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर गाव, प्रत्येक घरात शौचालय, प्लास्टिकवर बंदी आणि...

Cleanest Village in Asia : भारतात एक असं गाव आहे जे संपूर्ण आशियात स्वच्छ आणि सुंदर मानलं जातं. या गावातील प्रत्येक घरात शौचालय आहे, इथं प्लॅस्टिकवरही बंदी आहे. जाणून घेऊया भारतातील या अनोख्या गावाविषयी.

राजीव कासले | Updated: Oct 15, 2024, 09:34 PM IST
भारताच नाही तर आशियातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर गाव, प्रत्येक घरात शौचालय, प्लास्टिकवर बंदी आणि... title=

Cleanest Village in Asia : केंद्र सकारतर्फे देशातील साफसफाई आणि निसर्गाची काळजी घेणाऱ्या गावांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. भारतात अशी अनेक लहान मोठी गावं आहेत. पण देशात असं एक गाव आहे जे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशियात स्वच्छ आणि सुंदर (Cleanest Village in Asia)  मानलं जातं.  या गावातील प्रत्येक घरात शौचालय आहे. इथं प्लास्टिकवरही पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नाही तर गावात अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. 

या गावाला 'देवाचा बगीचा' (God’s Own Garden) असंही म्हटलं जातं.  या गावाचं नाव आहे मॉलिनॉन्ग. मेघालय (Mawlynnong village, Meghalaya)  राज्यातील ही सुंदर गाव पाहण्यासाठी हजारो पर्टयक येतात. मेघालयची राजधानी शिलॉन्गपासून 78 किलोमीटर दूरीवर 'मॉलिनॉन्ग' हे गाव आहे. या गावाला 'डिस्कव्हर इंडिया'तर्फे 2023 मध्ये आशियातील 'सर्वात स्वच्छ गावा'चा पुरस्कार मिळाला आहे. या गावाने स्वच्छतेचं काटेकोर पालन केलं आहे. 'मॉलिनॉन्ग' या गावात खासी जनजातीची लोकं राहातात. 

प्रत्येक घरात शौचालय
'मॉलिनॉन्ग' या गावात साक्षरतेचं प्रमाण 100 टक्के आहे. विशेष म्हणजे या गावात 2007 पासून प्रत्येक घरात शौचालय आहे. इथे कुठेच उघड्यावर शौच केलं जात नाही. गावातील कोपऱ्या-कोपऱ्यावर वेतापासून बनवण्यात आलेले कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले आहेत. झाडांच्या खाली देखील कचऱ्याचे मोठे डबे ठेवण्यात आले आहेत. जेणेकरुन झाडांवरची सुकलेली पानं या डब्यात पडतील. या गावात शहरासारखे पान खाऊन कोणीही थुंकत नाही. किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांचाही वापर होत नाही. इथं शंभर टक्के प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. वातावरण दुषित होऊ नये यासाठी या गावात सिगरेटवरही बंदी आहे. या नियमाचं पालन काटेकोरपणे केलं जातं. नियमांचं उल्लंघन केल्यास शिक्षेचीही तरतुद करण्यात आली आहे. 

आत्मनिर्भर गाव
'मॉलिनॉन्ग' या गावाची आणखी एक खासियत म्हणजे हे गाव पूर्णपणे आत्मनिर्भर आहे. गावातील लोकांना बाहेरच्या लोकांवर निर्भर राहावं लागत नाही. शेतीसाठी इथली लोकं स्वत:चं खत निर्मिती करतात. कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवण्याचा प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. शेताजवळ मोठे खड्डे बनवले असून यात गावातील सारा कचरा टाकला जातो, यानंतर यावर प्रक्रिया करुन खत बनवलं जातं. लोकं केवळ आपल्या घराचीच साफसफाई करत नाहीत, तर आपल्या घरासमोर रस्ताही दररोज झाडून काढतात.