मुंबई : आपण देशात कुठेही प्रवास करायचा म्हटला की, तो शक्य़तो आपण बस, ट्रेन आणि विमानाने करतो. यात ट्रेनचा पर्याय हा सगळ्यात कमी खर्चीक प्रवास आहे, तर विमानाचा प्रवास हा सर्वाधिक पैसे लागणार प्रवास आहे. परंतु जर कोणाला त्यांच्या ठरवलेल्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असेल. तर विमान हा एक चांगला उपाय आहे. कारण तुम्हाला जास्त जरी पैसे खर्च खरावे लागत असले तरी तुम्ही खूप कमी वेळात लांबचा प्रवास करु शकता.
आपल्यापैकी बरेच लोकं आपला वेळ वाचवण्यासाठी आता विमानाने प्रवास करतात. कारण ट्रेनपेक्षा थोडे पैसे जास्त देणे लोकांना परवडते. परंतु आता विमानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना थोडा विचार करावा लागणार आहे. कारण आता विमान प्रवास महागणार आहे.
आशियातील सर्वांत मोठी हवाई वाहतूक कंपनी इंडिगो विमान प्रवास महाग करण्याच्या विचारात आहे. एवढेच काय तर चेक-इन बॅगेजवर म्हणजेच प्रवाशांसोबतच्या सामानावर देखील आता शुल्क महागणार आहे.
‘इंटरग्लोब एविएशन लिमिटेड’द्वारा संचालित इंडिगो एअरलाइन्सचे सीईओ रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले की, "आम्ही यावर सरकारशी चर्चा करीत आहोत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही सर्व परिस्थिती सामान्य करू इच्छित आहोत. विशेष म्हणजे गो एअरलाइन्सनेही तिकिटाव्यतिरिक्त स्वतंत्रपणे बॅगेज चार्ज वसूल करण्याची तयारी चालविली आहे. या यादीत सहभागी होणारी इंडिगो ही दुसरी कंपनी ठरणार आहे."
त्यामुळे सुरूवातीला Go First Airlines आणि आता Indigo या दोन्ही कंपन्यांचा प्रवास महागल्यानंतर आता जवळ-जवळ सगळ्याच कंपन्या आपल्या प्रवास शुल्कात वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले की, "देशांतर्गत हवाई वाहतूक कंपन्यांना कोविडपूर्व काळाप्रमाणे 100 टक्के क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी सरकारने ऑक्टोबरमध्येच दिली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर मात्र 30 नोव्हेंबरपर्यंत बंदी राहणार आहे. आमचा महसूल पूर्ववत होत आहे. आम्हाला सध्या तरी वेगळा निधी उभारण्याची गरज नाही. त्यामुळे संस्थागत गुंतवणूकदारांना समभाग विकून निधी उभारण्याची आमची कोणतीही योजना नाही."