मुंबई : रशिया आणि युक्रेनदरम्यान सुरु असलेल्या युद्धाला आता दोन महिने होत आले. या युद्धाच्या झळा जगभरातील अनेक देशांना बसला आहे. यातून भारतही सुटलेला नाही. भारतात इंधनाच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे वाहतूक खर्च प्रचंड वाढला आहे आणि याचे परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर दिसू लागला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवर हैदराबादमधल्या एका कंपनीने तोडगा काढला आहे. भारतात सर्वात जास्त इलेक्ट्रिक बस पुरवणाऱ्या ओलेक्ट्रा या कंपनीने आता चक्क इलेक्ट्रीवर चालणाऱ्या म्हणजेच ई ट्रकच्या रोडवरच्या चाचण्या सुरु केल्या आहेत.
त्यामुळे लवकरच भारतात ई ट्रक धावताना दिसणार आहे. इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगमधील अग्रगण्य असणाऱ्या ओलेक्ट्रा कंपनीने आता ट्रक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रवेश केला आहे. या कंपनीने तयार केलेला बिल्ट-ऑन हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक टिप्परची एका चार्जवर 220 किमीची रेंज आहे. हैदराबादच्या उत्पादन प्रकल्पात यांची बाधणी होणार आहे.
कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के व्ही प्रदीप यांनी भारतातील अशा प्रकारचा पहिला ट्रक असल्याची माहिती दिली आहे. आमच्यासाठी हा खूप आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे. या टिपरमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्ये आहेत. वचन दिल्याप्रमाणे, आम्ही स्वप्न साकार केलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.