बिहार निवडणूक : CAA कायद्यावरुन पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बिहारमध्ये विरोधकांवर जोरदार टीका केली.

Updated: Nov 1, 2020, 04:47 PM IST
बिहार निवडणूक : CAA कायद्यावरुन पंतप्रधान मोदींची विरोधकांवर टीका title=

पटना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी बागहा येथे आयोजित सभेत विरोधकांवर टीका केली. सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे, राम मंदिर यासह विविध विषयांवर त्यांनी विरोधकांवर टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, सीएए कायद्याला एक वर्ष होणार आहे, परंतु सीएएमुळे कोणाचे नागरिकत्व गेले आहे काय?

पीएम मोदी यांनी विरोधकांवर टीका करत म्हटलं की, "जेव्हा नागरिकत्व दुरुस्ती कायदा आला तेव्हा त्यांनी (विरोधकांनी) यामुळे अनेक भारतीय नागरिकत्व गमावतील असा खोटा प्रचार केला." आता एक वर्ष झाले आहे, परंतु कोणत्याही भारतीय नागरिकाने नागरिकत्व गमावले आहे का? त्याच वेळी, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 काढून टाकल्यावर त्यांनी असेही म्हटले की काश्मीरमध्ये भडका होईल. रक्ताच्या नद्या वाहतील… काय काय बोलले गेले. पण आज जम्मू-काश्मीर आणि लडाख शांततेसह विकासाच्या नवीन मार्गावर आहे.''

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'राजकीय स्वार्थासाठी एनडीएच्या विरोधात उभे असलेल्या लोकांकडे कोणतेही तथ्य किंवा तर्क नाहीत. त्यांची नीती म्हणजे राष्ट्रहितासाठी आणि जनहितासाठी घेतलेल्या प्रत्येक पावलाला विरोध करणे आहे. निराशेचे वातावरण निर्माण करणे आणि फक्त नकारात्मकता हीत त्यांची रणनीती आहे.'

रविवारी बिहारमध्ये चौथ्या आणि शेवटच्या संभेत पंतप्रधान मोदींनी राम मंदिराच्या मुद्द्यावरहू विरोधकांना घेराव घातला. ते म्हणाले, जनजातीय समाज देशाच्या सुरक्षा, समृद्धी आणि मूल्यांचे रक्षणकर्ते आहेत. हे चंपा-अरण्य रामायण काळापासून त्याचे सजीव साक्षीदार आहेत. त्यांनी प्रत्येक वेळी भगवान राम आणि माता सीतेला साथ दिली. म्हणूनच आमचे वनवासी अयोध्येत भव्य राम मंदिर बांधण्यासाठी प्रतीक्षा करत होते. आज संपूर्ण देशाच्या सहकार्याने अयोध्येत लोकसहभागातून भव्य राम मंदिर बांधले जात आहे. परंतु यावेळेस, तुम्ही राममंदिराच्या उभारणीत अडथळे निर्माण करणारे आणि भगवान राम यांच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणाऱ्या लोकांना विसरू नका.''

राहुल-तेजस्वी यांच्यावर मोदींची टीका

दुसर्‍या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, 'आज बिहारमध्ये एकीकडे डबल इंजिनचं सरकार आहे तर दुसऱ्या बाजूला डबल-डबल राजकुमार आहे. ते म्हणाले की, काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश निवडणुकीत डबल-डबल युवराजची जी स्थिती झाली तीच स्थिती बिहारमधील जंगलराजच्या राजकुमारचीही होईल.'