नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी सायंकाळी परीक्षा कार्यक्रमांची घोषणा केली. सीबीएसईची दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 4 मेपासून सुरू होणार असून 10 जूनपर्यंत चालणार आहेत. 1 मार्चपासून प्रॅक्टिकल असतील. प्रॅक्टिकलनंतर परीक्षा सुरू होतील. बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 10 जुलैपर्यंत लागणार आहे. केंद्रीय मंत्री निशंक यांनी पुन्हा स्पष्ट केले की सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन होणार नाहीत. त्या पूर्वीप्रमाणे घेतल्या जातील.
दरवर्षी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होतात आणि मार्चमध्ये संपतात. तर मे महिन्यात निकाल जाहीर होतो. कोरोना महामारीमुळे या वर्षाच्या अखेरीस शैक्षणिक सत्र सुरू झाले आणि ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. मंडळाची परीक्षा नेहमीप्रमाणे केवळ ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीबीएसईने कोरोना व्हायरस साथीच्या रोगामुळे विशेष परिस्थितीत दोन्ही वर्गांसाठी 30% अभ्यासक्रम कमी केला आहे. याशिवाय पेपर पॅटर्नमध्येही बोर्डाने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.