केंद्र सरकारने 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढत या निर्णयाची घोषणा केली आहे. यामुळे केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणारी कार्यालयं, संस्था दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.
नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, कर्मचार्यांच्या उदंड भावना आणि त्यांच्या विनंतीमुळे केंद्र सरकारने 22 जानेवारी 2024 रोजी सर्व केंद्र सरकारची कार्यालयं, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनं राम मंदिर प्राणप्रतिष्ठानिमित्त दुपारी 2:30 वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
Due to the overwhelming sentiment of the employees and requests from them, Central Government announces half day closing till 2:30 pm on 22nd January 2024, at all Central Government offices, Central institutions and Central industrial establishments throughout India on the… pic.twitter.com/9xTPwSx3Ga
— ANI (@ANI) January 18, 2024
अयोध्येत 22 जानेवारीला होणारा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशभरात साजरा होणार आहे. कर्मचाऱ्यांना या आनंदोत्सावत सहभागी होता यावं यासाठी देसभरातील सर्व केंद्रीय कार्यालयं, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय आस्थापनं दुपारी 2.30 वाजेपर्यंत बंद असतील असं सांगण्यात आलं आहे. सर्व मंत्री आणि सरकारी कार्यालयांनी या निर्णयाची अंमलबजावणी होईल याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित असलेल्या भव्य समारंभाला 22 जानेवारीला सुरुवात होणार आहे. विश्वस्त मंडळाने सर्व उपस्थितांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी व्यवस्था उभारली आहे. त्यांना विशेष भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुट्टीची घोषणा कऱण्यात आली आहे. दरम्यान शाळा, कॉलेजलाही सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे. पण अद्याप त्यासंबंधी निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मंत्र्यांना आपापल्या मतदारसंघात हजर राहण्यास सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मंत्र्यांना दिवाळीप्रमाणे हा दिवस साजरा करा असं आवाहन केलं आहे. तसंच हे करताना मर्यादा पाळा असंही सांगितलं आहे.
दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, छत्तीसगड, हरियाणा या भाजपाशासित प्रदेशांनी सुट्टी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातही सुट्टी जाहीर करण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. पण याबद्दल निर्णय घेण्यात आलेला नाही.