मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

 मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून धावणार आहे. 

Updated: Jan 19, 2019, 09:19 AM IST
मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत  title=

मुंबई : मुंबईकर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आजचा दिवस खास असाच आहे. मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून धावणार आहे.  रेल्वेमंत्री पियुष गोयल राजधानी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर दिवा- पनवेल मेमू गाडी आता रोह्यापर्यंत धावणार आहे. या दोन्ही सेवांमुळे मुंबईकर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. राजधानी एक्स्प्रेसमुळे नाशिक कल्याण ही स्थानकेही थेट दिल्लीशी जोडली गेली आहेत. दुसरीकडे कर्जत-पुणे पॅसेंजरचा पनवेलहून विस्तार करण्यात आला आहे. याशिवाय मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लिफ्ट, सरकते जिन्यांचंही लोकार्पण आज होणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील आठ स्थानकांवरील नऊ पादचारी पूल खुले केले जाणार आहेत. तसंच ४० एटीव्हीएम मशीनही आजपासून सुरू केल्या जाणार आहेत.

Image result for rajdhani express zee news

मध्य रेल्वे मार्गावरून धावणारी राजधानी एक्स्प्रेस ही मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल. तिला कल्याण, नाशिक, जळगाव, भुसावळ, खंडवा, भोपाळ, झाशी, आग्रा आणि हजरत निजामुद्दीन (दिल्ली) असे थांबे असण्याची शक्यता आहे.  जळगावसह शेजारील औरंगाबाद, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील व्यापारी, नोकरदारवर्गाला राजधानी एक्स्प्रेसचा लाभ होणार आहे.
 
मुंबई ते इगतपुरीदरम्यान राजधानी एक्स्प्रेसची गेल्या आठवड्यात यशस्वीरित्या चाचणी घेण्यात आली. या एक्स्प्रेसच्या मार्गातील कसारा घाटाचा अवघड पाडाव पार करण्यासाठी अंतिम चाचणीही १४ जानेवारीला घेतली गेली. ही चाचणी यशस्वी झाल्यावर जानेवारी अखेरपर्यंत राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल (शुक्रवारी) पत्रकारांना ही माहीती दिली. 

Image result for rajdhani express zee news

सध्या संपूर्ण देशभरातून २३ राजधानी एक्स्प्रेस धावतात. त्यापैकी मुंबईहून २ एक्स्प्रेस धावतात. तसेच, मुंबई ते दिल्लीदरम्यान ‘ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस’ही धावते. परंतु, या तिन्ही एक्स्प्रेस पश्चिम रेल्वे मार्गावरून गुजरातमार्गे धावत असल्याने मध्य रेल्वे मार्गावरील जनतेला त्याचा फायदा होत नव्हता. आता मात्र मध्य रेल्वे मार्गावरून स्वतंत्र राजधानी एक्स्प्रेस धावणार असल्याने त्याचा लाभ उत्तर महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील जनतेला होणार आहे.