नवी दिल्ली: राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून ते जोरदार कार्यरत झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षातही उत्साहाचे आणि बदलाचे वारे वाहात असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम म्हणून काँग्रेस पक्षात खांदेपालट होत असून, विविध समित्यांवर नव्या चेहऱ्यांना संधी मिळताना दिसत आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसने शनिवारी ३ समित्यांची निर्मिती केली. यात प्रामुख्याने मराठी चेहऱ्यांनाही संधी देण्यात आली.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने नऊ सदस्यीय कोअर ग्रुप, १९ सदस्यीय जाहीरनामा समिती आणि १३ सदस्यांच्या प्रचार समितीची घोषणा शनिवारी केली.
सुमारे १९ सदस्य असलेल्या जाहीरनामा समितीत प्रामुख्याने प्रा. भालचंद्र मुणगेकर, राज्यसभेचे नवनिर्वाचीत सदस्या कुमार केतकर तसेच, आणि रजनी पाटील आणि मिलिंद देवरा यांचा समावेश आहे. यांसोबतच मनप्रीतसिंह बादल, पी. चिदंबरम, सुश्मिता देव, प्रा. राजीव गौडा, भूपिंदरसिंह हुड्डा, जयराम रमेश, सलमान खुर्शीद, कृष्णन बिंदू, कुमारी सेलजा, रघुवीर मीणा, मीनाक्षी नटराजन, सॅम पित्रोदा, सचिन राव, ताम्रध्वज साहू, शशी थरुर आणि ललितेश त्रिपाठी यांचा समावेश आहे.
ए. के. अँटनी, गुलामनबी आझाद, पी. चिदंबरम, अशोक गहलोत, मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल, जयराम रमेश, रणदीपसिंह सुरजेवाला आणि के. सी. वेणुगोपाळ या नऊ सदस्यांचा समावेश आहे.
प्रचार समितीमध्ये भक्तचरण दास, प्रवीण चक्रवर्ती, मिलिंद देवरा, कुमार केतकर, पवन खेडा, व्ही. डी. सतीशन, आनंद शर्मा, राजीव शुक्ला, दिव्या स्पंदना, रणदीपसिंह सुरजेवाला, मनीष तिवारी आणि प्रमोद तिवारी यांचा समावेश आहे.