मुंबई : SARS-COV-2 चा नवीन व्हेरिएंट Omicron मुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. आयआयटी शास्त्रज्ञांनी याबाबत अंदाज वर्तवला असून फेब्रुवारी महिन्यात तिसरी लाट उच्चांक गाठू शकते, या काळात देशात दररोज एक लाख ते दीड लाख रुग्णांची नोंद होण्याची अपेक्षा शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
दुसऱ्या लाटेपेक्षा असेल सौम्य
आयआयटीचे शास्त्रज्ञ मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं की, ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीपर्यंत येऊ शकते पण ती दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य असेल, ओमायक्रॉनच्या संसर्गाची तीव्रता डेल्टा इतकी तीव्र नसल्याचं प्राथमिक अभ्यासात समोर आलं आहे. असं असलं तरी
दक्षिण आफ्रिकेत नोंदवलेल्या ओमायक्रॉन प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे, जिथे या नवीन प्रकाराची अनेक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असं मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊन लागणार?
अग्रवाल म्हणाले की, सध्या दक्षिण आफ्रिकेत संसर्गामुळे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण वाढलेले नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्या नविन डेटानुसार परिस्थितीचं चित्र अधिक स्पष्ट होईल, असं मनिंद्र अग्रवाल यांनी म्हटलं आहे. रात्रीचा लॉकडाऊन आणि गर्दीवर नियंत्रण यासारखे कमी निर्बंध असलेल्या उपाययोजना केल्यास रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवता येईल, असंही अग्रवाल यांनी सूचवलं आहे.