नवी दिल्ली : हे सोल्यूशन आहे. तुम्ही पण घेऊन बघा...मस्त मज्जा येईल...काही महिन्यांपूर्वी नशा करणाऱ्या १३ वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
लोकांना त्याच्या बोलण्याचा अंदाज आवडला होता. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला पण तो मुलगा या दलदलमध्ये कसा सापडला याचा कोणी शोध घेतला नाही.
आता पुन्हा या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळेस सोल्यूशन पिताना नाही तर चेक्स शर्ट, गळ्यात टाय अशा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये तो मुलगा दिसत आहे.
कधीकाळी आईपेक्षा नशेला जास्त महत्त्व देणारा मुलगा शाळेत जाऊन येवढा खुश दिसतोय जणू त्याला नवे जीवनच मिळाले आहे.
'नशेबाज- द डाइंग पीपल ऑफ दिल्ली' या धीरज शर्माच्या शॉर्टफिल्मचा छोटा भाग कापून सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला होता.
या क्लिपमध्ये कमलेश नावाचा १३ वर्षाचा कचरा वेचक मुलगा दिसत आहे. कमलेश कचरा विकून १०० ते २०० रुपये कमावतो आणि नंतर त्या पैशांचे सॉल्यूशन विकत घेवून नशा करतो.
या व्हिडिओवर उदय फाऊंडेशनची नजर पडली. त्यांनी कमलेशच्या मदतीसाठी आपला हाथ पुढे केला. बघता बघता सारे काही बदलले आणि कमलेशने आपले नवे आयुष्य सुरू केले.
धरज शर्माची डॉक्यूमेन्ट्री फिल्म नशेबाज- द डाइंग पीपल ऑफ दिल्ली ने खूप साऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये अॅवॉर्ड जिंकले आहेत.
धरज शर्माच्या टीममधील एक सदस्य नीरज अग्नीहोत्रीने ही क्लिप यूट्यूबवर टाकली होती. यामध्ये कमलेशची कहाणी होती. हा व्हिडिओ ३५ लाखहून अधिक जणांनी पाहिला आहे.