नवी दिल्ली: भाजपकडून बुधवारी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांची लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी असेल. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या भोपाळमध्ये पक्षाने गेल्या ३० वर्षात एकदाही पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. काँग्रेसने १९८४ साली या मतदारसंघात शेवटचा विजय मिळवला होता. त्यामुळे यंदा भोपाळची लढत हायव्होल्टेज ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी आपल्या प्रतिस्पर्धी साध्वी प्रज्ञा सिंह यांना व्हीडिओच्या माध्यमातून खास संदेश पाठवला. या व्हीडिओमध्ये दिग्विजय सिंह यांनी साध्वी प्रज्ञा यांचे स्वागत केले आहे. भोपाळसारख्या रमणीय शहराचा शांत, सुक्षिशित आणि सभ्य वातावरण तुम्हाला आवडेल. आपण सगळे सत्य, अहिंसा आणि धर्माच्या मार्गाने वाटचाल करू, असा आशीर्वाद मी नर्मदा मातेकडे मागतो, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.
मैं साध्वी प्रज्ञा जी का भोपाल में स्वागत करता हूँ। आशा करता हूँ कि इस रमणीय शहर का शांत, शिक्षित और सभ्य वातावरण आपको पसंद आएगा।
मैं माँ नर्मदा से साध्वी जी के लिए प्रार्थना करता हूँ और नर्मदा जी से आशीर्वाद माँगता हूँ कि हम सब सत्य, अहिंसा और धर्म की राह पर चल सकें।
नर्मदे हर! pic.twitter.com/LYAbpTObgY— digvijaya singh (@digvijaya_28) April 17, 2019
तर दुसरीकडे साध्वी प्रज्ञा यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हटले की, भोपाळमध्ये धर्माचा विजय व अधर्माचा नाश होईल. या निवडणुकीत भगवा आणि विकास हे दोन प्रमुख मुद्दे असतील. मी भोपाळमधून बहुमताने निवडून येईल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले. भोपाळच्या जागेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. भोपाळ मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. २०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार आलोक सांजर यांना ७.१४ लाख मते मिळाली होती.
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर १०१ जण जखमी झाले होते.