नवी दिल्ली: केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेल तीन रुपयांनी महागणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात रशिया आणि सौदी यांच्यातील तेलयुद्धामुळे खनिज तेलाचे दर घसरले आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर ठेवण्यात येतील, असा अंदाज होता. मात्र, आता सरकारने उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे उलट पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ११ आणि १२ पैशांनी वाढ झाली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. परिणामी महागाईही वाढण्याची शक्यता आहे.
Excise duty on both petrol and diesel increased by Rs 3 per litre pic.twitter.com/PZn59cfd5o
— ANI (@ANI) March 14, 2020
आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घसरण होत असताना जास्तीत जास्त फायदा पदरात पाडून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रतिलिटर पेट्रोलवर रस्ते उपकरात एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. नव्वदीच्या दशकात आखाती युद्धकालानजीक खनिज तेलाच्या किंमती प्रतिबॅरल ४० डॉलर्सपर्यंत खाली घसरल्या होत्या. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण होऊनही भारतीय ग्राहकांना म्हणावा तसा फायदा झालेला नाही. उलट करात वाढ केल्याने ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे.