मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अमेरिकेत तर कोरोनामुळे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली. कोरोनामुळे जगभरात 5,734 लोकांचा मृत्यू झाला आहे. असं असताना भारतात कोरोनामुळे 10 रूग्ण एकदम ठणठणीत झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही आता 84 पर्यंत पोहोचली आहे.
कोरोनाची लागण ज्या देशातून झाली त्या चीनच्या वुहानमधून 20 वर्षीय तरूणी 30 जानेवारी रोजी केरळमध्ये आली. याच तरूणीमार्फत कोरोनाने भारतात प्रवेश केला. या तरूणीने स्वतः सतर्कता दाखवत आपल्या काही महत्वाच्या तपासण्या केल्या. यामध्ये तिला कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे आढळली. (भारतात कोरोनाची लागण झालेला पहिला रूग्ण एकदम ठणठणीत)
20 फेब्रुवारीपर्यंत या तरूणीवर जिल्हा रूग्णालयात उपचार होते. तिला आयसोलेडेट विभागात ठेवण्यात आलं होतं. सुरूवातीला या तरूणीच्या कुटुंबियांसाठी अत्यंत धक्कादायक बाब होती. मात्र तरूणीने स्वतः त्यावर ठाम भूमिका घेतली. आणि ती भारतातील पहिला कोरोनामुक्त व्यक्ती ठरली.
भारतातील पहिले तीन रूग्ण हे केरळमध्ये आढळले. यांच्यापाठोपाठ आणखी 7 रूग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळाली आहे. केरळमध्ये सध्या 71 रूग्ण हे डॉक्टरांच्या देखरेखी खाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याच सांगण्यात येत आहे.
'आम्ही केरळमधील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पण यावरून आम्ही सुरक्षित आहोत असं म्हणणं चुकीचं ठरेल. आम्ही उपचार करून तीन रूग्णांना कोरोनामुक्त केलेलं आहे,' अशी माहिती केरळचे आरोग्यमंत्री के के शैलजा यांनी पीटीआयला दिली आहे. तसेच केरळात कोरोनाग्रस्त रूग्णांना घरातच 28 दिवस आयसोलेशन भागात ठेवतात. इतर देशांत फक्त 14 दिवस ठेवले जाते.
कोरोनाबाधित रूग्णांना आम्ही विशिष्ट सूचना देतो. त्याचप्रमाणे त्यांची खास पद्धतीने देखरेख केली जाते. कोरोनाग्रस्त रूग्णांना आम्ही सामान्य उपचार देत आहोत. म्हणजे H1N1 सारखे सामान्य आजाराप्रमाणे त्यांच्यावर उपचार होत असल्याचं केरळच्या anti-nCoV task force चे इन्चार्ज डॉं अमर फेटले यांनी सांगितलं.
बाहेरच्या देशांमधून येणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय चाचणी केल्याशिवाय त्यांना पुढे पाढवलं जात नाही. या व्यक्तींना 15 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे. त्यानंतर त्यांना घरीदेखील 24 तास आयसोलेशनमध्ये ठेवलं जातं आहे. यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी मदत होत आहे. मात्र आयसोलेशन विभागात ठेवताना रूग्णांची आणि त्यांच्या कुटुंबियांची मानसिकता नसते. यामुळे सुरूवातीला त्यांच काऊन्सिलिंग केलं जातं आहे.