पणजी : गोव्यात येत्या १५ दिवसांसाठी माशांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. मासे टिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्मेलिनमुळे कर्करोग होत असल्याचं पुढे आलंय. नेमकी हीच भीती घेऊन आयात बंदीचा निर्णय मुख्यमंत्री मनोहर पर्रिकारांनी घेतलाय. गोव्यात बाहेरील राज्यातून येणाऱ्या माशांमध्ये फॉर्मेलीन हे घातक रसायन मिळाल्याने माशांवर बंदी घालण्याचा निर्णय पर्रिकर यांनी घेतलाय. जून आणि जुलै माशांचा अंडी घालण्याचा काळ असल्यानं आणि समुद्र खवळल्यानं १ जून ते ३१ जुलैदरम्यान मासेमारीवर बंदी असते. त्यामुळे परराज्यातून मोठ्या प्रमाणावर माशांची आयात होते. मात्र हे मासे टिकवण्यासाठी त्यांच्यावर फॉर्मेलिनचा वापर केला जातो.
फॉर्मेलिनमुळे या रसायनामुळे कर्करोग होऊ शकतो अशी चर्चा आहे. त्यामुळे गोव्यातल्या जनतेत भीतीचं वातावरण पसरलंय. सुरूवातीला काही तक्रारींवरून अन्न आणि औषध प्रशासनानं काही ठिकाणी छापे टाकून माशांचे ट्रक जप्त केले आणि सॅम्पलच्या आधारे या माशांमध्ये फॉर्मेलिन असल्याचं आढळून आलं. त्यामुळे भीतीत आणखीनच भर पडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मासे विक्रीवर बंदी घातलीय. दरम्यान केरळमध्येही २८ हजार किलो माशांमध्ये फॉर्मेलिन सापडल्यामुळे माशांचे सर्व कंटेनर परत पाठवल्याची माहिती केरळच्या अन्न आणि औषध प्रशासनानं दिलीय.