अहमदाबाद : गुजरातचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे बडे नेते गळाला लावण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या दोघांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लोकसभा निवडणुकी भाजप आणि काँग्रेसकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. एक एक उमेदवार दोघांसाठी महत्वाचा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज वर्तविणयात येत आहे. त्यामुळे एकमेकांचे नेते, आमदार, खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. यात भाजप आणि काँग्रेसने आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
काँग्रेसचे अल्पेश ठाकोर, ललित वसोया भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. सोमभाई पटेल हेही काँग्रेसचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या या आमदारांना मंत्रीपदही दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच भारत ठाकोर, धवल झाला हेही काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. भाजपकडून हे नेते निवडणूक लढू शकतात. तर हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर असून ते जामनगरमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. तर भाजपचे नारायण पटेल काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे.