Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये चढताना घसरून लोक आपला जीव धोक्यात घालत असल्याच्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. अशातच आता नुकत्याच सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्येही (Vande Bharat Express) अपघात घडत असल्याचे समोर आलं आहे. रेल्वेकडून वारंवार सुरक्षेच्या उपाययोजना केल्या जात असतानाही अपघाताच्या घडना घडत आहेत. अशीच एक घटना हावडा स्थानकातून (Howrah) समोर आली आहे. एका प्रवाशाने धावत वंदे भारत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पाय घसरला आणि तो रेल्वे फलाट आणि ट्रॅकच्या मध्ये पडता पडता वाचला. तिथे कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानांने (RPF) देवदूताप्रमाणे या प्रवाशाचा जीव वाचवला आहे.
पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकावर हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. हावडा रेल्वे स्थानकावर चालत्या वंदे भारत ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशाचे आरपीएफ जवानाने प्राण वाचवले आहे. या घटनेवेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ही सगळी त्याच्या कॅमेरामध्ये कैद केली आहे. हावडा - पुरी वंदे भारत एक्स्प्रेस हावडा स्टेशनवरून निघत असताना मंगळवारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गाडी निघण्यावेळी हावडा - पुरी वंदे भारत एक्स्प्रेसचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. त्यावेळी मात्र गार्ड केबिनचे दरवाजे उघडे ठेवले होते. ज्यामध्ये त्या प्रवाशाने चढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पाय घसरला आणि ती व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध फटीमध्ये पडणार होती. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या आरपीएफ जवानाने त्याला पकडले आणि बाहेर काढले. या प्रवाशाचा जीव थोडक्यात बचावला. सुखरूप वाचल्यानंतर प्रवाशाने आपला जीव वाचवणाऱ्या आरपीएफ जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
RPF officer at #Howrah station rescued a passenger's life. The passenger was rushing to catch the #VandeBharat train, departed from the platform. Thinking a door was open, collided with it, on the verge of slipping onto the tracks when officer swiftly intervened... pic.twitter.com/Muaofn6UJE
— know the Unknown (@imurpartha) October 10, 2023
दरम्यान, तेलंगणामध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता. तेलंगणातील बेगमपेट रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात पडलेल्या एका महिला प्रवाशाला एका हवालदाराने वाचवले होते. आणखी एका घटनेत मार्चमध्ये मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथे एका चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका व्यक्तीचा ट्रेनमध्ये चढताना पाय घसरला होता. त्यावेळी तिथे कर्तव्यावर असलेले आरपीएफ कॉन्स्टेबल सुशील कुमार यांनी त्यांना वाचवले होते. रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना धावत्या गाड्यांमध्ये चढू नका किंवा उतरू नका असे वारंवार आवाहन केले आहे.