...तर मोदींवर 'डिझास्टरस प्राईम मिनिस्टर' अशा नावाचा चित्रपट येईल- ममता बॅनर्जी

नरेंद्र मोदींच्या इंग्रजीच्या ज्ञानावरही ममता बॅनर्जींनी टिप्पणी केली.

Updated: Jan 11, 2019, 09:19 PM IST
...तर मोदींवर 'डिझास्टरस प्राईम मिनिस्टर' अशा नावाचा चित्रपट येईल- ममता बॅनर्जी title=

 

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी सध्या गाजत असलेल्या 'द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला हाणला. जर 'एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' असा चित्रपट येऊ शकतो, तर नरेंद्र मोदी यांच्यावरही एक चित्रपट आला पाहिजे. या चित्रपटाचे शीर्षक 'डिझास्टरस प्राईम मिनिस्टर' असे असेल. भविष्यात असा चित्रपट नक्कीच येईल. नियती कोणालाही माफ करत नाही, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. 

तत्पूर्वी पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात झालेल्या सभेतही ममता बॅनर्जी यांनी मोदींची खिल्ली उडवली होती. त्यांनी नरेंद्र मोदींच्या इंग्रजीच्या ज्ञानावरही टिप्पणी केली. नरेंद्र मोदी मोठमोठी भाषणे देतात. मात्र, त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजी बोलायचे असल्यास त्यांना टेलीप्रॉम्टरची गरज लागते. प्रसारमाध्यमांना ही गोष्टी माहिती आहे. त्यामुळे मोदी इंग्रजी भाषणावेळी केवळ स्क्रीनवर लिहलेले वाचतात. परंतु आम्ही अशा कोणत्याही साधनांचा वापर करत नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १९ तारखेला ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे जाहीर सभेचे आयोजन केले आहे. यावेळी भाजपविरोधी पक्ष एकाच मंचावर जमण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा समावेश आहे.