नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर नव्याने चलनात आलेल्या २०० आणि २००० हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी समोर आलीये. जर तुमच्याकडेही २०० आणि २००० रुपयांच्या नोटा आहेत तर तुमचे कदाचित नुकसान होऊ शकते. रिझर्व्ह बँक इंडियाने याबाबत मोठी घोषणा केलीये. २०० आणि २००० रुपयांच्या नोटा आता बँकांमध्ये बदलल्या जाणार नाहीये. आरबीआयकडून चलनात आलेल्या २०० आणि २००० रुपयांच्या नोटा काही कारणामुळे खराब झाल्या तर त्या बँकेत बदलता येणार नाहीतय इतकंच नव्हे तर बँकेत या नोटा जमाही करता येणार नाही. आरबीआयने नोटांच्या अदलाबदलीच्या नियमांतर्गत या नोटांना ग्राह्य धरलेले नाही.
२००० रुपयांच्या नव्या नोटा ८ नोव्हेंबर २०१६ नंतर चलनात आणल्या होत्या. तर ऑगस्ट २०१७मध्ये २००च्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. आरबीआयच्या नोट रिफंड नियमानुसार फाटलेल्या अथवा डाग पडलेल्या नोटा बदलता येतात. आरबीआयच्या या अॅक्टमध्ये ५, १०, ५०, १००, ५००, १०००, ५००० आणि १०,००० रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. मात्र यात २०० आणि २०००च्या नव्या नोटांचा समावेश नाही. त्यामुळे या नोटा फाटल्यास वा खराब झाल्यास बँकांमध्ये बदलता वा जमा करता येणार नाहीत.
सध्या २००० रुपयांच्या तब्बल ७.६० लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात आहेत. नुकतीच काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, आरबीआयने २००० रुपयांच्या नव्या नोटांची छपाई बंद केलीये. १७ एप्रिलला इकॉनॉमिक अफेयर्सचे सेक्रेटरी सुभाष सी गर्ग यांनीही याला दुजोरा दिला होता.
२०० आणि २०००च्या नोटांबाबत आरबीआयला नियमांमध्ये बदल कऱणे गरजेचे आहे. दरम्यान आरबीआयकडून २०१७मध्येच या बदलाबाबत अर्थ मंत्रालयाला पत्र देण्यात आलेय. सूत्रांच्या माहितीनुसार, आरबीआयला अद्याप सरकारडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही.
आरबीआयच्या माहितीनुसार, नव्या सीरीजमधील या नोटा खराब झाल्या असतील वा फाटल्या असतील तर आता या नव्या नोटा बदलता येणार नाहीत.