353 कोटी तर हिमनगाचं टोक! आयकर विभागाला वेगळीच शंका; धीरज साहूंच्या घरी खोदकाम सुरु

Dheeraj Sahu House Gold Reserves: साहू यांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर छापेमारी केल्यानंतर 5 दिवस 50 बँक अधिकारी 5 काऊंटिंग मशीनच्या सहाय्याने पैशांची मोजणी पूर्ण करण्यात आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 13, 2023, 03:50 PM IST
353 कोटी तर हिमनगाचं टोक! आयकर विभागाला वेगळीच शंका; धीरज साहूंच्या घरी खोदकाम सुरु title=
साहू यांच्या घरात सापडलेल्या संपत्तीसंदर्भातील चौकशी सुरु आहे

Dheeraj Sahu House Gold Reserves: झारखंडचे काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या मालकीच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण 353 कोटी रुपये नगद जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने केलेल्या या कारवाईची भारतभरामध्ये चर्चा असतानाच ही रक्कम केवळ हिमनगाचं टोक आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. कारण आयकर विभागाला आता धीरज साहू यांनी आपल्या घरामध्ये मोठा खजिना लपवल्याची शंका आहे. आयकर विभाग आता धूरज साहू यांच्या रांची येथील रेडियम रोडवरील घरामध्ये जमीन खोदण्याचं काम करत आहे.

आयकर विभागाला शंका

छापेमारी करणाऱ्या टीमने राज्यसभेच्या खासदाराच्या निवासस्थानी जाऊन शोध सुरु केला आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घरातील जमीनीचीही तपासणी केली जात आहे. जमीनीखाली लपवून ठेवण्यात आलेला ऐवज आणि दागिण्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना जमीनीखाली मोठं घबाड असण्याची शंका येण्यामागील कारण साहू यांच्याकडे आतापर्यंत सापडलेली संपत्तीच आहे. साहू यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात नगद सापडली आहे की नक्कीच त्यांच्या घराखाली जमीनीमध्ये अजून संपत्ती असेल अशी शंका आयकर विभागाला आहे.

कुटुंबासोबत अधिकारी तपासासाठी पोहोचले

साहू यांच्या लोहरदगा येथील निवासस्थानी 3 गाड्या घेऊन आयकर विभागाचे 12 अधिकारी तपासाठी पोहोचले आहेत. हे लोकही जमीन तपासून पाहणार आहेत. साहू यांच्या कुटुंबातील 3 जण या टीमबरोबर आहेत. या सर्वांना सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

छापेमारीत काय घडलं?

जमीनीखाली काही लपवण्यात आलेलं नाही ना याची चाचपणी आता आयकर विभागाकडून सुरु आहे. झारखंडमधून काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्याशी संबंधित रांची आणि इतर ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालंगीर जिल्ह्यात सर्वात जास्त रक्कम सापडली आहे, जी अंदाजे 305 कोटी आहे. त्यानंतर संबलपूर आणि टिटलागड येथे अनुक्रमे 37.5 कोटी आणि 11 कोटी सापडले आहेत. धाडीत सापडलेली रक्कम अधिकारी बालंगीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जमा केली आहे. एसबीआयचे स्थानिक व्यवस्थापक भगत बेहरा यांनी सांगितलं आहे की, टीमने 176 पैकी 140 बँगेंची मोजणी केली. हा कारवाई मद्य व्यवहाराशी संबंधित करचोरीमुळे करण्यात आली आहे. आयकर विभागाने याच आरोपात मद्य व्यवहाराशी संबंधित कंपनीच्या ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये बौद्ध डिस्टीलरी प्रायव्हेट लिमिटेड, बलदेव साहू इन्फ्रा लिमिटेड, क्वालिटी बॉटलर्स आणि किशोर प्रसाद-विजय प्रसाद बिवरेज लिमिटेड कंपन्यांचा सहभाग होता. यामधील एक कंपनी बलदेव साहू इन्फ्रा फ्लाई ऐश विटांचा व्यवसाय करते, तर इतर कंपन्या दारुशी संबंधित व्यवसायात आहेत.