India China Standoff: भारत विरुद्ध चीनचा संघर्ष दिवसागणिक नवं आणि तितकंच गंभीर वळण घेताना दिसत आहे. या परिस्थितीमध्ये अरुणाचलमधील भूभागाला चीनी नावं देत चीननं पुन्हा एकदा भारताचा रोष ओढावला आणि हे प्रकरण शमत नाही, तोच आता डोकलाम परिसरात चीनमधील सैन्याच्या हालचाली वेग धरताना दिसत आहेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार डोकलामनजीक चीन सातत्यानं सैन्यबळ वाढवत असून, तिथं असणाऱ्या सैनिकांचा आकडा आता आणखी वाढला आहे.
चीनच्या सैन्याच्या या हालचाली पाहता भारतीय लष्करही सतर्क झालं असून, या सर्व हालचालींवर करडी नजर ठेवून असल्याचं सांगण्यात येत आहे. भूतानच्या अमो चू खोऱ्यानजीक सध्या चीनच्या सैन्यानं मोठ्या संख्येत लष्करी तळ ठोकल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळत आहे. हा भाग डोकलामनजीक असल्यामुळं तेथील हालचालींवर भारतीय लष्कराची सातत्यानं नजर आहे.
अमो चू खोऱ्यापासून भारताचा सिलिगुडी कॉरिडोअर चीनच्या सैन्यासाठी सरळ रेषेत असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय हा भाग भारत - चीन - भूतानच्या ट्राय जंक्शनपासून किमान अंतरावर आहे. इथंच 2017 मध्ये बिजींग रस्ते निर्मितीच्या मुद्द्यावरून भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये हिंसक झटापट झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
दरम्यान, एका वृत्तवाहिनीनं प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांमध्ये अमो चू नदीच्या खोऱ्यामध्ये चीनच्या सैन्याकडून मोठ्या प्रमाणात बांधकाम केल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये 1000 हून अधिक कायमस्वरुपी बांधकामं आणि अनेक किरकोळ स्वरुपाची बांधकामं करत हजारो सैनिकांच्या निवाऱ्यासाठी तिथं व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
डोकलाममध्ये भारतीय सैन्याच्या विरोधाचा सामना केल्यानंतर आता चीनच्या सैन्याकडून कुरापती करत पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे. जिथं भारतीय लष्कराचं कवच भेदून डोकलामच्या पश्चिम भागात घुसखोरी करण्याचा त्यांचा मनसुबा दिसून येतोय.
डोकलाम हे एक एकाकी पठार असून, भारतीय लष्करानं जेव्हा या मुद्द्यात उडी घेतली तेव्हा 2017 पूर्वी या भागामध्ये चीन किंवा भूतानचं सैन्य फार कमी प्रमाणात फिरकताना दिसत होतं. किंबहुना भूतानही आपल्याच देशाच्या हद्दीत येत असल्याचा दावा चीनकडून करण्यात आला होता. किंबहुना 1960 मध्ये चीनच्या सरकारकडून भूतान, सिक्कीम आणि लडाख हे एकत्रितरित्या तिबेटचा भाग असल्याचा दावा करण्यात आला होता.
दरम्यान, भारतीय लष्कराशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार चीनशासित भूतानमधील भागावर आणि दक्षिण डोकलामवर होणारी कोणतीही कारवाई भाराताच्या संरक्षणाच्या दृष्टीनं धोकादायत ठरेल. किंबहुना डोकलाम पठारावर हक्क मिळाल्यास चीनच्या कुटनितीला याचा फायदा होईल. ज्यामुळं इतकी वर्षे हा वाद चिघळत चालला आहे.